५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:39 AM2021-08-17T04:39:47+5:302021-08-17T04:39:47+5:30

बुलडाणा : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यात चांगलेच भोवले आहे. कारण, ...

Licenses of 53 drug sales centers suspended | ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

Next

बुलडाणा : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यात चांगलेच भोवले आहे. कारण, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, एका मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

१३ तालुके असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात हजाराच्या ज‌‌वळपास परवानाधारक औषधी विक्री केंद्रे आहेत. या केंद्रांची मागील सात महिन्यांत अन्न व औषध विभागाने केल्या पडताळणीत तब्बल ५३ मेडिकल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. या औषधी विक्री केंद्रचालकांना याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र, खुलाशाला साजेसे असे उत्तर न मिळाल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने या औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. पुढील काळातही या औषधी विक्री केंद्रांवर विशेष लक्ष असून, त्यामध्येही त्रुटी आढळल्यास त्या संचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामुळे झाले परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांमध्ये परवाना मिळविण्यासाठी आ‌वश्यक असणाऱ्या अटींचे पालन न करणे, स्टाॅकची उपलब्धता किती आहे, याचे विवरण नसणे, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड नसणे, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चिखलीच्या एका मेडिकलचा परवाना रद्द

चिखली येथील एका मेडिकलचा परवाना अन्न व औषधी विभागाने रद्द केला आहे. या मेडिकलच्या संचालकाकडे औषधी खरेदी-विक्रीचे बिलच नव्हते. असलेले रेकॉर्डही समाधानकारक नसल्याने या मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच औषधी विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक जण बगल देताना दिसतात. अशांवर अन्न व औषध विभागाचा वॉच असून, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

- अ.तु. बोर्डे, सहायक आयुक्त, औषधी विभाग, बुलडाणा

Web Title: Licenses of 53 drug sales centers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.