संततधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; चार तालुक्यात अतिवृष्टी
By निलेश जोशी | Published: July 19, 2023 02:49 PM2023-07-19T14:49:36+5:302023-07-19T14:58:40+5:30
नांदुरा तालुक्यात भिंतपडून एकाचा मृत्यू
बुलढाणा: जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून शेगाव, मलकापूर, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाल आहे. घाटाखालील पाच तालुक्यातील १९ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी येथील एका वृद्धाचा मंदिराची भिंत पडल्याने मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
दुसरीकडे रस्त्याच्या कामामुळे मलकापूर शहरातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १८ जुलै रोजी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातल्यात्यात घाटाखालील पाच तालुक्यांना या पावसाने झोडपले आहे. पुर्णानदीही दुथडी भरून वाहत असून हातणूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे मलकापूर तालुक्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता पहाता या धरणाचे ३० दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले असून त्यातून १ लाख ५६ हजार क्युसेक (४,४३६ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हातणूर धरण हे सध्या ५९ टक्के भरलेले आहे.
दुसरीकडे घाटावरील भागात संततधार पाऊस झाला असला तरी कोठे मोठे नुकसान झालेेल नाही. प्रामुख्याने घाटाखालील पाच तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक असा ९१ मिमी पाऊस झाला असून त्या खालोखाल जळगाव जामोद तालुक्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ७६.२ आणि मलकापूर तालुक्यात ७५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर परिरात रस्ता कामासाठी केलेल्या खोदकामामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नांदुरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शहरातील सांडपाण्याच्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे हे पाणी सखल भागात साचले आहे. मलकापूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. घाटाखालील अनेक शेतात सध्या पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मंदिराची भिंत पडून एक ठार
या संततधार पावसादरम्यान नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील देवीच्या मंदिराची भिंत कोसळली. भिंतीचा भरावही त्यामुळे खाली आला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नेमके यावेळेस मामुलवाडी येथील प्रताप नामदेव गावंडे (६०) आणि त्यांचा मुलगा शुभम प्रताप गावंडे (२४) हे दोघे घराशेजारी म्हशीचे दुध काढत असताना भिंत कोसळली. त्याच्या भरावाखाली दोघे ही दबल्या गेले होते. त्यात ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बाहेर काढले असता प्रताप गावंडे यांचा मृत्यू झाला तर शुभम गावंडे हे जखमी झाले आहेत, अशी माहिती नांदुरा तहसिलदारांनी जिल्हा प्रशासनास कळवली आहे.