वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप; २ वर्षांपूर्वीची घटना
By संदीप वानखेडे | Published: September 20, 2023 06:45 PM2023-09-20T18:45:08+5:302023-09-20T18:45:30+5:30
मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
संदीप वानखडे / बुलढाणा
मेहकर : वडिलांचा कुऱ्हाडीने खून करणाऱ्या मुलास मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने २० सप्टेंबर राेजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मेहकर येथील समतानगरमधील रहिवासी आशाबाई गजानन गवई यांनी मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली होती की, २९ मे २०२१ रोजी त्यांचा मुलगा शुभम गजानन गवई हा संध्याकाळी साडेपाच वाजता मोबाइलवर गेम खेळत होता. म्हणून त्यास त्याचे वडील गजानन हे त्याच्यावर रागावले. मुलगा व वडिलांत वाद झाला. त्यानंतर शुभम घरातून निघून गेला. रात्री आठ वाजता येऊन त्याने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
शुभम गवई विरूद्ध मेहकर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने ५ पुरावे दाखल केले. फिर्यादी व स्वतंत्र साक्षीदार फितूर झाले. उलटतपासणी आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपी मुलास बुधवारी आमरण जन्मठेपेची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास आरोपीस भोगावा लागणार आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. जे. एम. बोदडे यांनी काम पाहिले.