४० फूट खोल विहिरीतील सापाला जीवनदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:15+5:302021-01-09T04:29:15+5:30
चिखली : तालुक्यातील पळसखेड भट येथील जनार्दन मेरत यांच्या विहिरीत असलेल्या कपारीत विषारी कोब्रा जातीचा साप असल्याची माहिती मिळताच ...
चिखली : तालुक्यातील पळसखेड भट येथील जनार्दन मेरत यांच्या विहिरीत असलेल्या कपारीत विषारी कोब्रा जातीचा साप असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र संदीप कांबळे यांनी विहिरीत सुमारे ४० फूट उतरून सापाची सुखरूप सुटका केली आहे.
पळसखेड भट शिवारात मेरत यांची गावाला लागूनच शेती आहे. शेतातील विहिरीवर नेहमीप्रमाणे कामासाठी ८ जानेवारी सकाळी १० वाजता गेलेल्या शेतकऱ्यास विहिरीत कोबरा साप दिसून आला. दरम्यान, शेतकरी मेरत यांनी रायपूर येथील सर्पमित्र संदीप दीपक कांबळे यांना माहिती दिली. याची तातडीने दखल घेत कांबळे यांनी विहिरीवर जाऊन सर्प पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अत्यंत अवघड जागेवर अडकलेल्या सापाला पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता कांबळे यांनी ४० फूट खोल विहिरीत उतरून मोठ्या शिताफीने पकडल्यानंतर जंगलात सोडून देत त्यास जीवनदान दिले आहे. कांबळे यांनी सात वर्षात विविध जातींच्या सुमारे ७०० सापांना पकडून सुखरूप जंगलात सोडून दिले आहे.