मृत्यूच्या दाढेतून वाचविले सर्पदंश झालेल्या गाईचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:06+5:302021-04-22T04:36:06+5:30
शहरातील प्रभाग ११ चे नगरसेवक दत्ता सुसर नेहमीप्रमाणे आपल्या प्रभागात फिरत असताना पुंडलिकनगरमधील आंब्याच्या झाडाजवळ एक गाय स्वत:भोवती चकरा ...
शहरातील प्रभाग ११ चे नगरसेवक दत्ता सुसर नेहमीप्रमाणे आपल्या प्रभागात फिरत असताना पुंडलिकनगरमधील आंब्याच्या झाडाजवळ एक गाय स्वत:भोवती चकरा मारताना व तोंडाला फेस आल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. यावरून शंका आल्याने त्यांनी अधिक पाहणी केली असता, गाईला विषारी सापाने दंश केल्याची शंका आली. गाईवर वेळीच उपचार गरजेचे असल्याचे हेरून काही जाणकार मंडळींशी तातडीने संपर्क साधून वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण निळे, डॉ. शिंदे, अशोक हिवरे, शुभम वाघमारे यांनी तातडीने गाईकडे धाव घेतली. उपचार सुरू करून गाईला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गाईवर उपचार सुरू होते. दरम्यान, संध्याकाळी उशिरा गाईची प्रकृती स्थिर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रामुख्याने जनावरांना सर्पदंश झाल्यास ते सैरभैर होतात. अशास्थितीत त्यांच्यावर उपचार करणेदेखील जिवावर बेतणारे ठरते. मात्र, सुसर तसेच आरमाळ, शरद पाटील, मयुर देशमुख, शाम पठाडे, संतोष जाधव, शैलेश भालेराव, राजू सोळंकी आदी सहकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत गाईला दोरीच्या साहाय्याने बंदिस्त करून धरून ठेवण्यासह योग्य ती मदत पुरविल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोपे झाले. दरम्यान, गाईच्या मालकाविषयी चौकशी केली; पण माहिती मिळाली नाही. मात्र, सुसर, त्यांचे सहकारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून योग्यवेळी उपचार केल्याने गाईची प्रकृती आता स्थिर झाली असून, तिच्या मृत्यूचा धोका टळला आहे.
मालक बिनधास्त, नागरिक त्रस्त; पालिका हतबल!
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. चारा-पाण्याचा अभाव असल्याने ही जनावरे अनेकदा घरात शिरतात. मिळेल त्या अन्नावर ताव मारून निवांत रवंथ करतात. रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांवर कायम अपघाताची टांगती तलवार असते. जनावरांच्या मालकांना याचे काहीच सोयरसुतक नसते. पालिका कारवाईचा बडगा उगारते, तरीपण फरक पडत नसल्याने पालिका हतबल ठरली आहे.