अकोला येथील गोदामातून पुन्हा चार दिवसांपासून धान्याची उचल बंद!

By अनिल गवई | Published: March 10, 2024 08:04 PM2024-03-10T20:04:34+5:302024-03-10T20:04:42+5:30

जिल्हा पुरवठा विभागाचे पुन्हा पत्र: माहे मार्चच्या धान्याच्या उचलीस १५ पर्यंत मुदतवाढ

lifting of grain from the warehouse in Akola has been stopped for four days again! | अकोला येथील गोदामातून पुन्हा चार दिवसांपासून धान्याची उचल बंद!

अकोला येथील गोदामातून पुन्हा चार दिवसांपासून धान्याची उचल बंद!

अनिल गवई/ खामगाव: भारतीय वखार महामंडळाच्या अकोला येथील गोदामातून धान्याची उचल देण्यास विलंब होत असल्याने बुलढाणा जिल्हा पुरवठा विभाग अडचणीत सापडला आहे. अनियमित उचलीचा सामना पुरवठा विभागाला करावा लागत असतानाच, गत चार दिवसांपासून गोदामातून पूर्णंता उचल बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत जिल्हा पुरवठा विभागाच्या संकटात सापडणार असल्याचे संकेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि वाशिम येथील गोदाम गत काही दिवसांपासून बंद आहे. अनियमितमेमुळे खासगी कंत्राटदाराचा गोदाम हाताळणूक आणि व्यवस्थापनाचा कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील धान्य उचलीसाठी अकोला येथील दोन्ही गोदामाशी जोडणी करण्यात आली आहे. मात्र, अकोला येथील गोदामातून धान्याची उचल देण्यास विलंब होत असल्याने, िजल्हा पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही धान्य उचल बाबत केंद्रीय वखार महामंडळाकडून दिरंगाई केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्याचवेळी गोदामात मोठ्याप्रमाणात वाहने उपलब्ध असतानाही पूर्ण क्षमतेने वाहने भरून दिली जात नसल्याचाही आरोपही िजल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

धान्याची उचल करण्यास शासनाकडून मुदतवाढ

सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य व्यपगत होऊ नये म्हणून पुरवठा विभागाकडून मुदतवाढीसाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार माहे मार्च २०२४ च्या धान्याची उचल करण्यासाठी शासनाने ७ ते १५ मार्च पर्यंत धान्याची उचल करण्यासाठी ६ मार्चरोजी मुदतवाढ दिली आहे. सात दिवसांची मुदतवाढ मिळून देखील चार दिवस उचल न मिळाल्याने मुदत वाढीचा फायदा होणार नसल्याचे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

अकोला येथील गोदामातून धान्य मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच गोदामात धान्यसाठा संपत आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य वाटप कसे करावे, याचा प्रश्न जिल्हा पुरवठा विभागाकडून होत आहे. दरम्यान, तब्बल साडेसहा हजार धान्याच्या उचलीचा तिढा सोडवावा तरी कसा, असा पेच जिल्हा पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे. दीड हजार मेट्रीक टन गहू आणि पाच हजार मेट्रीक टन तांदळाची उचल प्रलंबित आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था पूर्णता कोलमडल्याचे दिसून येते.

Web Title: lifting of grain from the warehouse in Akola has been stopped for four days again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.