ऐन सणासुदीच्या दिवसात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:58+5:302021-09-02T05:13:58+5:30
सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दैनंदिन जीवनात गृहिणींना विजेचा वापर असलेल्या उपकरणाचा दररोज आधार घ्यावा लागतो तसेच मंगळागौर, ...
सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही दैनंदिन जीवनात गृहिणींना विजेचा वापर असलेल्या उपकरणाचा दररोज आधार घ्यावा लागतो तसेच मंगळागौर, महालक्ष्मी, गणपती आदी सण साजरे करायचे झाल्यास घरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार करावे लागतात. पाटा, वरवंट्यावरील कामे जवळपास इतिहासातच जमा झाल्याने महिला भगिनींना मिक्सर, मायक्रो ओव्हन, ग्रॅण्डर, इंडक्शन शेगडी ,अशा अत्याधुनिक इलेक्ट्रिकल्स साधनांचा आधार घ्यावाच लागतो. परंतु तांत्रिक कारणांमुळे गत महिनाभरापासून वीजपुरवठा सातत्याने खंडित हाेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.
विजेची उपकरणे ठरताहेत शाेभेची वस्तू
सध्या बऱ्याच गावामध्ये डेंग्यूची साथ पसरत आहे. त्यामुळे घराघरांत विजेचा पंखा कायम सुरूच ठेवावा लागतो. लहान मुलांना पंख्यांशिवाय झोप लागत नाही. व्यापाऱ्यांनाही अनेक उपकरणांकरिता विजेची आवश्यकता भासते. सध्याच्या परिस्थितीत वीज, वादळ, वारे, पाऊसविरहित वातावरण असून, देखील विजेचा सारखा लपंडवाचा खेळ का सुरू आहे? असा प्रश्न येथील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. सर्वसामान्य जनतेचे विजेचे बिल थकल्यावर कनेक्शन तोडण्यात तत्परता दाखविणाऱ्या विद्युत महामंडळाने अखंडित वीजपुरवठा करण्याची सेवाही तत्परतेने दाखवावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.
गत एक महिन्यापासून वीज ये-जा करत असून, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्युत कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा अविरत ठेवण्यासाठी तत्परता दाखवावी.
- प्रकाश मुंढे,ग्रामपंचायत सदस्य, किनगाव राजा.