धक्कादायक! वादळात पाळण्यासह उडाली चिमुकली, जागीच मृत्यू; अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली
By संदीप वानखेडे | Updated: June 12, 2024 16:45 IST2024-06-12T16:44:17+5:302024-06-12T16:45:04+5:30
तब्बल दाेनशे फूट उंच जाऊन अँगल खाली काेसळला. या घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक! वादळात पाळण्यासह उडाली चिमुकली, जागीच मृत्यू; अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली
अंढेरा : पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव घुबे येथे ११ जून राेजी सायंकाळी वादळास पाऊस झाला. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. वादळात लाेखंडी अँगलला बांधलेला पाळणा व टिनपत्रे हवेत उडाली. तब्बल दाेनशे फूट उंच जाऊन अँगल खाली काेसळला. या घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली आहेत.
देऊळगाव घुबे येथे ११ जून राेजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. वादळाचा वेग माेठा असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. वादळामुळे वीज वितरण विभागाने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे गावकरी जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते. गावातील भरत साखरे यांची सई नाव असलेली चिमुकली घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती. घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वाऱ्याने घरावरील टिनपत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासह हवेत उडाली. हवेत उडालेला झोका घरपासून दोनशे फूट अंतरावर जाऊन आदळला. त्यामध्ये झोक्यातील चिमुकली जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महसूलचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गावकऱ्यांनी तातडीने चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.