जिवंत मतदाराला दाखवले मृत; मतदानापासून राहावे लागले वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:48 PM2019-04-18T18:48:35+5:302019-04-18T21:10:34+5:30
डोणगाव: जीवंत मतदाराला मृत दाखवल्याचा प्रकार डोणगाव येथील एका मतदान केंद्रावर समोर आला आहे.
डोणगाव: जीवंत मतदाराला मृत दाखवल्याचा प्रकार डोणगाव येथील एका मतदान केंद्रावर समोर आला आहे. निवडणूक विभागाच्या या चुकांमुळे काही मतदारांवर मतदानापासून वंचीत राहण्याची वेळ आली. मतदार असूनही अनेक जण मतदानापासून वंचित राहिल्याचा हा प्रकार डोणगाव येथे घडला आहे. १८ एप्रिलला लोकसभेचे मतदान करण्यासाठी आलेल्या अनेक जणांना मतदान न करताच परत घरी जावे लागल्याने मतदारांमध्ये रोष दिसून आला. डोणगाव येथे मतदार यादीत नाव असल्याने व मतदार कार्ड असतानाही मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान यादीत नावासमोर ‘डिलीटेड’ लिहीलेले असल्याने काही मतदारांना मतदान करता आले नाही. तर जिवंत मतदारांसमोर मयत लिहिले असल्याने त्यांना ही मतदानापासून वंचित राहावे लागले, असाच अनुभव डोणगाव येथील नेहा विवेक अजबे यांना मतदान केंद्र क्रमांक १२५ वर आला. नेहा अजबे यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली असून त्या आतापर्यंत डोणगाव येथे सासरी मतदान करतात. १८ एप्रिलला त्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्या असता त्यांना मतदार यादीत नावासमोर ‘डिलीटेड’ लिहिलेले असल्याने त्यांना मतदान करु दिले नाही. त्यांनी प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला व या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मतदारांची यादी यापूर्वी प्रकाशीत करून आक्षेप नोंदविणसाठी मुदत दिली होती. संबंधित व्यक्तीचे नाव कोणत्या कारणाने डिलीटेड केले आहे, याबाबत संपुर्ण माहिती घेऊन चौकशी केली जाईल.
- संजय गरकल,
तहसीलदार मेहकर