दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात
By Admin | Published: December 19, 2014 01:09 AM2014-12-19T01:09:46+5:302014-12-19T01:09:46+5:30
पशुपालक संकटात : संभाव्य चारा व पाणीटंचाईची धास्ती.
नाना हिवराळे / खामगाव (बुलडाणा)
यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात चारा व पाणीटंचाईच्या धास्तीने शेतकर्यांनी पशुधन बाजारात विक्रीस काढले आहे. खामगावच्या गुरांच्या आठवडी बाजारात मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीस आली; मात्र जनावरांच्या किमती घसरल्याने पशुपालक संकटात सापडले आहेत.
खामगाव येथील गुरुवारच्या बाजारात आठवड्यागणीक जनावरांची विक्रीसाठी गर्दी वाढतच आहे. दुष्काळ व सद्य:स्थितीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता गुराढोरांच्या चारा व पाण्याची समस्या बिकट होणार असल्याने जनावरे विक्रीस काढली आहेत.
खामगावच्या बाजारात बैलजोडीचे भाव अक्षरश: अध्र्यावर आले आहेत. एक लाख किंमत असणार्या बैलजोडीस ६0 हजारांपेक्षा जास्त मागणी आलीच नाही. ५0 ते ६0 हजार किंमत असणारी व ३0 ते ४0 हजारापर्यंत बैलजोडीची किंमत पाहून पशुपालक डोक्याला हात लावून बसले होते. ४0 हजार किंमत असणारी बैलजोडीला २0 ते २५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याचे बाजारात दिसून आले. शेतकरी फक्त बैल विक्रीसाठीच आणत असल्याचे चित्र आहे. खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नसल्याने व्यापारीच खरेदी करीत आहेत. चारा व पाणीटंचाईच्या भीतीपोटी विक्रीस काढलेले पशुधन मातीमोल भावात विकण्याची परिस्थिती शेतकर्यांवर ओढवली आहे.
*जनावरांचे भाव घसरले
खामगावच्या बाजारात गुरुवारी जनावरांची विक्रीकरिता आवक वाढली. म्हैस १0८, बकरी २९७, तर बैल १४६ विक्रीस आणले होते. बैलांची संख्या वाढली असली तरी भाव मात्र एकदमच घसरले होते. कमीत कमी १0 हजार ते महत्तम ४0 हजार रुपये जोडीचा भाव दिसून आला. दुष्काळाच्या गडद छायेत वृषभराजाला मातीमोल भावात विकावे लागत असल्याची परिस्थिती शेतकर्यांसमोर आली आहे.