अवकाळी पावसानंतर पशुधन चोरीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:51+5:302021-03-25T04:32:51+5:30

दुधा येथील विक्रम शेणुबा सोनुने यांचे माळवंडी शिवारात शेत आहे. सोबतच त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ भागाजी सोनुने यांची शेती ...

Livestock theft crisis after unseasonal rains | अवकाळी पावसानंतर पशुधन चोरीचे संकट

अवकाळी पावसानंतर पशुधन चोरीचे संकट

Next

दुधा येथील विक्रम शेणुबा सोनुने यांचे माळवंडी शिवारात शेत आहे. सोबतच त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ भागाजी सोनुने यांची शेती आहे. या शेतातील गोठ्यात त्यांचे पशुधन बांधलेले होते. २४ मार्चला पहाटेच्यासुमारास काहीतरी आवाज आल्यामुळे ते घराच्या बाहेर पडले. भुईमुगाच्या शेतात त्यांना रानगवे घुसले असावे, असे वाटले; पण शेतात त्यांना काही दिसले नाही. त्यामुळे ते परत झोपी गेले. पहाटे चारच्यासुमारास ते शेणपाणी करण्यासाठी गोठ्यात गेले असता, त्यांचे पशुधन तेथून गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी त्यांनी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये विक्रम सोनुने यांचे ७५ हजार रुपये किमतीचे दोन बैल, १५ हजार रुपये किमतीचा एक गोऱ्हा, ११ हजार रुपये किमतीची एक वगार, तर त्यांच्या भावाच्या मालकीचा ४० हजार रुपयांचा बैल, १५ हजार रुपये किमतीचा एक गोऱ्हा आणि ७ हजार रुपये किमतीची एक वगार असे १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे पशुधन अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी धाड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास धाड पोलीस करत आहेत.

-रायपूर गटामध्येही चोरीच्या घटना-

पिंपळगाव सराई : रायपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मातला शिवारातही पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, रायपूर येथील शेखख्बूल एस यांच्या पाच बकऱ्या व मातला येथील समाधान वतपाव यांच्या दोन गायी व एक बैल, तसेच शेषराव शिरसाट यांच्या दोन गाई चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, शेषराव सिरसाट यांची नुकतीच व्यायलेली गायही चोरीला गेली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांचे तिचे वासरू सैरावैरा झाले आहे. त्यामुळे या वासराला जगवण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

Web Title: Livestock theft crisis after unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.