विद्यार्थ्याच्या मृतदेहासहीत स्थानिकांचा शाळेसमोर ठिय्या
By admin | Published: March 30, 2017 12:57 PM2017-03-30T12:57:55+5:302017-03-30T15:13:05+5:30
देऊळघाट येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 30 - राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात जनूना येथील विद्यार्थी निवृत्ती चंडोल जखमी झाला होता. या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जनूना येथील नागरिकांनी गुरूवारी सकाळी स्कूलमध्ये मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका गावक-यांनी घेतल्याने वातावरण तापले होते.
राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान रून नं. पाचमध्ये स्फोट झाला. या स्फोटात जनूना येथील वर्ग पाच मध्ये शिक्षण घेत असलेला आदिवासी समाजाचा विद्यार्थी निवृत्ती चंडोल (वय ११) हा जखमी झाला. त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र निवृत्तीची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. येथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचे निधन झाले. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह जनूना येथे आणण्यात आला.
यावेळी शेकडो गावकरी त्याचा मृतदेह घेऊन शाळेत दाखल झाले. यावेळी निवृत्तीच्या पालकांनी व गावातील नागरिकांनी आक्रोश करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. जापर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका गावक-यांनी घेतल्याने वातावरण तापले होते. जवळपास तीन तास निवृत्तीचा मृतदेह घेऊन गावकरी शाळेसमोर उभे होते. यावेळी पोलिसांनी गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी निवृत्तीचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन जाण्याचे ठरवण्यात आले.
पोलीस कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून अखेरीस मृतदेहाची विटंबना होवू नये म्हणून गावकरी मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेवून गेले.
स्फोट कशाचा?
राजीव गांधी मिल्ट्री स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलाचा स्फोटाने मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, हा स्फोट कशाचा होता, याच गूढ कायम आहे. पोलीस व शाळा प्रशासनाने सदर स्फोट हा पेन्सिल सेलचा असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पेन्सिल सेलच्या स्फोटाने मुलाचा मृत्यू होवू शकत नाही. हा सेल मुलाकडे कोठून आला. असे प्रश्न मुलाचे पालक उपस्थित करीत आहे. मुलगा सेलसोबत खेळत असताना स्फोट झाल्याचे शाळा प्रशासन सांगत आहेत. हा स्फोट कशाचा झाला, याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही.