उष्माघात कक्षाला कुलूप; रुग्ण वा-यावर!
By admin | Published: April 2, 2017 01:59 AM2017-04-02T01:59:28+5:302017-04-02T01:59:28+5:30
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण वाढत्या तापमानामुळे त्रस्त.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. १- गत आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, जिल्ह्यात पारा ४0 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आरोग्य विभाग निद्रिस्त असून, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाला कुलूप लावण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी स्वत:करिता कूलर लावले असून, रुग्णांना मात्र उकाड्याचा सामना करावा लागत असल्याचे ह्यलोकमतह्णने शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे.
स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षात एक कूलर लावण्यात आला आहे. त्याचा फायदा रुग्णास होत नसून, वैद्यकीय अधिकारी फायदा घेत आहेत. रुग्णांच्या वार्डात कूलरची कोणतीच सोय नसून, सध्या गरम हवा फेकणारे पंखे आहेत. त्यामुळे ४0 डिग्री सेल्सिअस तापमानात रुग्णांची लाही लाही होत आहे. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांना थंड पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या रुग्णालयात रुग्णांसाठी पाण्याची टाकी आहे. मात्र, उष्णतेमुळे पाणी असले, तरी रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना गरम पाणी मिळत आहे. रुग्णाला तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचारी घरून पाणी घेऊन येतात. याशिवाय त्यांच्या कक्षात कूलर लावण्यात आल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होत आहे. मात्र, रुग्णांच्या वार्ड क्रमांक दोन महिला सर्जरी, वार्ड क्रमांक तीन महिला रुग्ण, वार्ड क्रमांक पाच बालरोग विभाग, वार्ड क्रमांक सहा पुरुष सर्जरी, वार्ड क्रमांक आठ पुरुष रुग्ण, वार्ड क्रमांक नऊ प्रसूती कक्ष आहे. या सर्व कक्षामध्ये फक्त पंखे असल्यामुळे त्यांना गरम हवा मिळत आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास होत असून, अनेक रुग्ण खिडकीचा आधार घेताना दिसत होते, तर रुग्णांच्या नातेवाईकांनी वार्डाच्या बाहेरचा परिसर ताब्यात घेतला होता. त्यातील अनेक व्यक्ती उन्हाच्या झळामुळे हैराण झालेले दिसून आले. रुग्णालयातील फक्त अपघात कक्ष व उष्माघात कक्षात प्रत्येकी एक कूलर ठेवण्यात आला आहे.
जळीत कक्षातील "एसी" बंद
येथील सामान्य रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जळीत कक्ष उभारण्यात आला आहे. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास जळीत कक्षातील रुग्णांना होत असतो. यासाठी दोन एसी लावण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी एकच एसी सुरू असून, एक एसी बंद असल्यामुळे रूग्णांना मोठय़ा प्रमाणात त्रास होताना दिसून येतो.
उष्माघाताचा एकही रूग्ण नसून ज्या रूग्णांच्या वार्डामध्ये कुलर नसेल त्याठिकाणी लवकरच कुलर लावण्यात येईल.
-ए.व्ही.सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा