अनुदानित बियाणांसाठीच्या अर्ज प्रक्रियेत लॉकडाऊनचा खोडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:46+5:302021-05-13T04:34:46+5:30
बुलडाणा : शासकीय अनुदानित बियाणांसाठी भरावयाच्या अर्ज प्रकियेत लॉकडाऊनचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी तसेच ...
बुलडाणा : शासकीय अनुदानित बियाणांसाठी भरावयाच्या अर्ज प्रकियेत लॉकडाऊनचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवावी तसेच लॉकडाऊनमध्ये कृषी केंद्रांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा जि. प. सदस्य जयश्री शेळके यांनी १२ मे रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे आणि रास्त भावाचे बियाणे मिळावे यासाठी शासनाद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. यावर्षी सदर योजनेसाठी अर्ज सादर करण्याकरिता १५ मे, २०२१ पर्यंतच मुदत आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यामध्ये २० मे, २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या योजनेसाठी मुदत वाढवून देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसेच खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. पाऊस पडण्याआधी पेरणीसाठी लागणाऱ्या खते, बी-बियाणांची जमवाजमव करून ठेवणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे; परंतु लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासकीय अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अर्जाच्या मुदतीत वाढ करण्यात यावी. तसेच लॉकडाऊनमधून कृषी केंद्रांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे़