Lockdown in Buldhana : रस्त्यांवर शुकशुकाट, जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:09 AM2021-05-12T11:09:18+5:302021-05-12T11:09:26+5:30
Lockdown in Buldhana: निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यात येत असून पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या दहा दिवसाच्या कडक निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान शहरी भागासह ग्रामीण भागातही या कठोर निर्बंधांची अंमलबाजवणी करण्यात येत असून पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. प्रामुख्याने कोरोनाचे हॉटस्पॉट, संभाव्य गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते.
दरम्यान जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या असून मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या जिल्ह्याच्या चार सीमाही सील करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुसरीकडे बुलडाणा शहरास, मेहकर, चिखली, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा, खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोदसह सर्वच तालुक्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जिल्ह्यातील २,६०० पोलिसांचा या कामी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरी भागात पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कठोर निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत होती. एकट्या बुलडाणा शहरात ४२ व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
बुलडाण्यात ६५ पोलीस कर्मचारी
बुलडाणा शहरात ६ अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तथा चार भरारी पथकांचे साहाय्य घेत कठोर निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नगर पालिकेचेही कर्मचारी त्यांना सहकार्य करत आहे. १४ चौरस किमी विस्तार असलेल्या बुलडाणा शहरातील प्रत्येक नगरामध्ये पालिकेने बॅरिकेडस उभारून नागरिकांची वर्दळ वाढणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. शहरात ४४ ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. चिखली शहराच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. मेहकर, लोणार, देऊळगाव राजा येथेही असेच चित्र आहे.
सात जणांवर कारवाई
n बुलडाणा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणारऱ्या सात जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रूपये दंड वसुल केला. संचारबंदीत दुकान चालु ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावही कारवाई करण्यात आली.
पालिका, महसूल व ग्रामपंचायतीचे सहकार्य
जिल्ह्यातील नागरी भागाची लोकसंख्या ६ लाखांच्या आसपास आहे तर ग्रामीण भागातील लोकसंख्या ही १९ लाखांच्या घरात आहे. त्यात आता वाढ झालेली आहे. मात्र ही लोकसंख्या विचारात घेऊन पोलीस, पालिका, महसूल आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडक निर्बंधांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिसांची मदत घेऊन कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाेलीसांनी कठाेर निर्बंधांची अंमलबजावणी अत्यंत गंभीरतेने केली असून शहरी व ग्रामीण भागात पाेलीसांची पथके गस्त करीत आहेत.