जिल्ह्यात २३ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:41+5:302021-03-16T04:34:41+5:30
या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. दूधविक्रेते, दूध वितरण केंद्र ...
या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. दूधविक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायंकाळी ६ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू राहतील. शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के संख्या ग्राह्य धरून ही कार्यालये सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्सही ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. त्यानंतर, सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत पार्सल सुविधा देण्याची परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी आवश्यक राहील. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील. अंत्यविधीकरिता २० व्यक्तींना परवानगी असेल. शैक्षणिक संस्थामध्ये संशोधन कर्मचारी, अशैक्षणिक कर्मचारी, वैज्ञानिक यांना उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ही कामे करण्यास परवानगी राहील.
--मालवाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार--
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. आंतर जिल्हा बस वाहतुकीस एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह शारीरिक अंतर व निर्जंतुकीकरण करून प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी राहणार आहे. चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल. मॉर्निंग वॉकला परवानगी राहील.
--राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना बंदी--
जिल्ह्यातील सर्व सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहणार आहेत, तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील, तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी १० व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, खासगी शिकवणी केंद्र बंद राहतील. मात्र, ऑनलाइन शिक्षणास परवानगी राहील. वैद्यकीय सेवा वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. रुग्णवाहिकांचीही सेवा २४ तास उपलब्ध राहतील.
--पूर्वनियोजित परीक्षा वेळापत्रकानुसारच--
या कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा त्यांच्या वेळापत्रकानुसार होतील. परीक्षार्थींना परीक्षेचे अेाळखपत्र व पालकांना त्यांचे अेाळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने शारीरिक अंतर, मास्क व निर्जंतुकीकरण नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.