बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:24 PM2021-03-01T12:24:09+5:302021-03-01T12:24:20+5:30
Buldhana Lockdown हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, जिल्ह्यात गेल्या १७ फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाला आठ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनसंदर्भातील अनेक नियम शिथिल केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार सायंकाळी सहा ते सकाळी या कालावधीत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत अकारण रस्त्यांवर फिरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या आस्थापना या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू राहतील. मात्र शहरी तथा ग्रामीण भागात महसूल, पालिका व पोलिसांच्या पथकाकडून नियमित स्वरुपात तपासणी करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे बंदच राहणार असून हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची मुभा राहील. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, धाबे व गॅरेज सुरू राहतील. सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालये त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यासोबतच कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसेच दूध विक्रेते, दूध वितरण केंद्रे ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत.
लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी
लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी राहणार आहे. वधू व वराचाही यात समावेश असून, तहसीलदारांकडून त्यासाठी परवानगी मिळेल. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशांनाच मुभा राहील. आंतरजिल्हास्तरावरील बससेवा सुरू राहील; मात्र क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना त्यात प्रवेश दिला जाईल. ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ सुरू राहील. परंतु मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे.