लॉकडाउन: चवथ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:36 AM2020-05-19T10:36:34+5:302020-05-19T10:36:40+5:30
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडानच्या चौथ्या टप्प्याला १८ मेपासून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले. शहरातील एका ओळीत पाच पेक्षा अधिक दुकाने सुरू असून, त्यावर गर्दीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली. रस्ते, दुकाने गजबजल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले लॉकडाउन १७ मे नंतर आता ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. लॉकडाउनचा हा चौथा टप्पा आहे. दुकानांची वेळही बदलण्यात आली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यातही प्रतिबंधीत क्षेत्र अर्थात कंटेनमेन्ट झोनमधील सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. किराणा, भाजीपाला, दूध, कृषी व बांधकाम साहित्य, सिलबंद मद्यविक्री आदी दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय आस्थापना, मेडीकल, लॅब, दवाखाने, रुग्णवाहिका सेवांसोबतच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नगर पालिका क्षेत्राबाहेरील पेट्रोल पंप २४ तास सुरू राहणार आहेत.
या भागात सलग पाच पेक्षा जास्त दुकाने एका ओळीत उघडी न ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी या आदेशाला बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी खो बसला आहे. बुलडाण्यात एका ओळीत सलग पाचपेक्षा जास्त दुकाने उघडी होती. एका दुकानांवर पाचच ग्राहक नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांची चांगली धावपळ झाली.
दुचाकींना बंदी; पोलिसांची धावपळ
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यामध्ये दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुचाकींना प्रतिबंधीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १७ मे रोजी दिले. त्याची अंमलबजावणी १८ मे पासून होणे आवश्यक होते; मात्र आज सकाळपासून दुचाकींने रस्ते गजबजल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवासोबतच विनाकारण बाहेर पडणाºयांच्या दुचाकीही रस्त्याने सुसाट धावत आहेत. पोलिसांनी बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त लावला. येणाºया प्रत्येक दुचाकीचालकाची चौकशी सुद्धा केली. परंतू प्रत्येकजण दवाखाना, किराणा सामान, औषधी यासरखे कारणे दखवत असल्याने पोलिसांचीच चिंता वाढली होती.