जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:16+5:302021-03-23T04:37:16+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. सर्व दुकाने सकाळी ८ ते ५ ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. सर्व दुकाने सकाळी ८ ते ५ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, काेचिंग क्लासलाही परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी २२ मार्च राेजी जारी केले आहे.
काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवला आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदच राहणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका, अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरिता ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचा समावेश असेल. अंत्यविधीकरिता २० व्यक्तींना परवानगी असेल.
सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामाकरिता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतरजिल्हा बस वाहतूक एकूण प्रवासीक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून प्रवासी वाहतुकीस परवानगी राहील. मॉर्निंग वॉकला परवानगी असेल. सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा २४ तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत हाेणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसनक्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. कोविडची लक्षणे दिसून येताच संबधित कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे.
काेचिंग क्लासेसला मिळाली परवानगी
जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस, खासगी शिकवणी केंद्रांना प्रत्येक बॅचच्या नियमित आसनक्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीतजास्त २० विद्यार्थ्यांसह सकाळी ९ ते सायं. ५ या कालावधीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांची कोविड चाचणी आवश्यक राहील. त्यामुळे, नीट व इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.