लॉकडाऊन: दहशत ते बिनधास्तपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:35+5:302021-03-24T04:32:35+5:30
प्रारंभीक काळात कोरोनाची एक दहशत सर्वसामान्यांना होती. त्यामुळे बुलडाण्यात २८ मार्चला पहिला कोरोना बाधित आढळून आला व उपचारादरम्यान त्याचा ...
प्रारंभीक काळात कोरोनाची एक दहशत सर्वसामान्यांना होती. त्यामुळे बुलडाण्यात २८ मार्चला पहिला कोरोना बाधित आढळून आला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंतर संपूर्ण शहर सुमसाम झाले होते. त्या उलट आज गेल्या एक वर्षातील मोठ्या पातळीवरील असा कोरोनाचा विस्फोट जिल्ह्यात झालेला आहे. लॉकडाऊनच्या वर्ष पूर्तीच्या दिवशीच विक्रमी असे ८६१ जण जिल्ह्यात पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र गेल्या वर्षीची कोरोनाची दहशत आता कुठेही दिसत नाही. नागरिक बिनधास्तपणे त्यांचे दैनंदिन व्यवहार करत आहे. बाजारपेठांमध्येही गर्दी होत आहे. त्यातूनच कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.
--आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढल्या--
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राचे विदारक चित्रही स्पष्ट झाले होेते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आल्यानंतर लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत प्रभावी असे उपचार करणारे कोविड समर्पित रुग्णालय आज बुलडाण्यात उभे ठाकले आहे. यवतमाळ, नाशिक, जालना, अमरावती येथूनही कोराेनाचे काही रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन युनिट आणि लिक्वीड ऑक्सिजनबाबत जिल्हा आता स्वयंपूर्ण झाल्यात जमा आहे.
--विकासाला फटका--
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच, जिल्हा परिषदेच्या योजना, वार्षिक योजनेला फटका बसला. २२३ कोटींपैकी अवघे ८८ कोटी विकास कामांसाठी मिळाले. लोकप्रतिनिधींच्या निधीसह सर्वच विभागांच्या निधीला कात्री लागली. या निधीवरील निर्बंध आता जानेवारी महिन्यात सैल झाले. आमदारांना स्थानिक विकास निधीसाठी सात कोटी रुपये उपलब्ध झाले. वार्षिक योजनेचाही ७५ टक्के निधी उपलब्ध झाल्याने प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आली.
--कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जंबो हॉस्पिटल--
गेल्या वर्षीच्या तुलनेत आता खऱ्या अर्थाने कोराेनाचा विस्फोट झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारांच्या टप्प्यात गेली आहे. आतापर्यंतची ही मोठी सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रावर वाढता ताण पाहता बुलडाण्यातच ५०० खाटांचे जंबो हॉस्पिटल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.