लॉकडाऊन अवैध गौण खनिजमाफियांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:20+5:302021-04-29T04:26:20+5:30
डोणगाव : काेराेना संक्रमण वाढल्याने राज्यभरात लाॅकडाऊन करण्यात आले असून संचारबंदी करण्यात आली आहे़ ही संचारबंदी अवैध गाैण ...
डोणगाव : काेराेना संक्रमण वाढल्याने राज्यभरात लाॅकडाऊन करण्यात आले असून संचारबंदी करण्यात आली आहे़ ही संचारबंदी अवैध गाैण खनिजमाफियांच्या पथ्यावर पडत आहे़ डाेणगावातून दरराेज शेकडाे ब्रास मुरूम व रेतीची वाहतूक हाेत आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे़
कोरोना काळात कित्येक व्यवसाय ठप्प झाले, तर जीवनावश्यक नसल्याने कित्येक व्यावसायिक आपली दुकाने बंद करून घरी बसलेले आहेत़ यात किराणा,भाजीपाला या अत्यावश्यक सेवेलासुद्धा वेळेची बंधने आहेत़ मात्र, डोणगावमध्ये महसूल विभागाच्या कृपेने दिवसरात्र संचारबंदीला पायाखाली तुडवून अवैध मुरूम उत्खनन करीत आहेत़ त्यांना कोणताच नियम नाही.
डोणगावमध्ये दुपारी कोणीही दिसणार नाही़ मात्र, गावातून इकडूनतिकडे जाणारे मुरूम भरलेले ट्रॅक्टर दिसून येतात़ त्यावर कोणत्याही प्रकारचे परवाने नसलेला चालक ट्रॅक्टर वेगाने चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ या ट्रॅक्टरच्या चपाट्यात येऊन अनर्थ घडू शकतो़ एकीकडे दुकाने बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन रस्त्यावर आहे तर दुसरीकडे बिनधास्त अवैध मुरूम उत्खनन करून घेऊन जाणारी ट्रॅक्टर गावात फिरत आहेत़ तहसीलदार यांना माहिती मिळाली आणि ते डोणगाव पोचण्याचा आत अवैध उत्खनन करणाऱ्यांना माहिती मिळते़ त्यामुळेच अवैध उत्खनन जोरात सुरू आहे.
लॉकडाऊनमध्ये ही गुटखा विक्री जोमात
डोणगाव येथे व परिसरात सध्या गुटखामाफियांनी आपले बस्तान बसवले आहे़ शासनाचा प्रतिबंधित गुटखा डोणगाव येथे व परिसरात खुलेआम मोटरसायकल वर घेऊन गावात व ग्रामीण भागात सर्रास विकल्या जात आहे़ गुटखा विक्रेते सकाळीच ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना गुटखा पोच करीत आहेत़ याकडे अन्न औषध प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याने बुलडाणा गुन्हा अन्वेषण विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे़