लॉकडाऊनने घरातील पैसा संपला, मात्र कोरोना संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:39+5:302021-05-31T04:25:39+5:30
जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ...
जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
यामुळे गर्दी कमी होऊन कोरोनाची साखळी तुटेल, असे प्रशासनाला वाटले; परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणारे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. जीवनावश्यक किराणासुद्धा प्रशासनाच्या यादीतून त्यावेळी अनावश्यक झाला होता. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली असल्याने सध्या किराणा आणि भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना होत नाही आणि इतर दुकाने उघडली तर आणखी किती गर्दी वाढणार? आणि वाढणाऱ्या त्या थोड्याफार गर्दीमुळेच कोरोना होईल काय? असा प्रश्न व्यावसायिक वर्गामधून उपस्थित केला जात आहे.
घरखर्च भागवायचा कसा
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसायांचे गणित बिघडले आहे. सकाळी तीन ते चार तास थोडाफार व्यवसाय केल्यानंतर दिवसभर घरात बसावे लागत आहे, तर काहींचे व्यवसायच बंद झाल्याने घरखर्च भागवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्यापारी सोबतच मजूर वर्गही हताश
लॉकडाऊनमुळे दुकानांवर काम करणारे, तसेच इतर मजूर वर्गाच्या हातालासुद्धा काम नसल्याने तेसुद्धा हतबल झाले आहेत. शासनाने मोफत स्वरूपात केवळ गहू व तांदूळ दिले आहेत. तेव्हा त्यावर कसे जीवन जगायचे? इतर लागणारा किराणा आणण्यासाठी पैसा आणायचा तरी कोठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.