Lockdown : बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवस राहणार कठोर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:01 AM2021-05-10T10:01:07+5:302021-05-10T10:01:22+5:30
Lockdown in Buldhana : जिल्ह्यात १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून २० मे च्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधानंतरही जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून, रुग्ण दुपटीचाही वेग ३५ दिवसांवर आला आहे. कोराेनाची साखळी तुटण्याऐवजी रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यात १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून २० मे च्या सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेची परवानगी असणार आहे. सोबत कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय तथा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
घरपोहोच सेवा, ग्राहकांसाठी दुकाने बंद
सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, मिठाई, बेकरी, पिठाची गिरणी यासह खाद्य पदार्थांची दुकाने बंद राहणार आहेत.
पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांशी निगडित दुकाने, गॅस एजन्सी बंद राहील. मात्र, घरपोहोच सिलिंडरचे वाटप सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत करता येईल.
या प्रतिष्ठानांना राहणार सवलत
खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन, औषध सेवा २४ तास सुरू राहील.
अत्यावशक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये, एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांना परवानगी राहील.
शासकीय यंत्रणेमार्फत मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयक कामे चालू राहतील. या काळात विविध यंत्रणांना वेगवेगळ्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
घरपोहोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, तसेच संबंधित दुकानाचे अेाळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्ह्यात १० मे च्या रात्री ८ वाजल्यापासून २० मे च्या पहाटे ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. दहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल, दवाखाने व दुधाचे वितरण वगळता इतर दुकाने व आस्थापना, शासकीय कार्यालये सुरू राहणार नाहीत. वृत्तपत्राचे वितरण सुरू राहणार आहे.
- एस. रामामूर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा