डोणगावात महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप!
By admin | Published: July 4, 2017 12:09 AM2017-07-04T00:09:52+5:302017-07-04T00:09:52+5:30
डोणगाव विकासापासून दूर असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : डोणगाव हे राज्य महामार्गावरील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, ही ग्रामपंचायत विविध समस्या व कारणांनी गाजत असतानाच वार्ड क्रमांक दोनमध्ये कोणताच विकास नसल्याने व वार्डात जाण्यासाठी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत तर रस्त्यावर घाणीतून वार्डवासीयांना जावे लागते. खांबावर लाईट नाहीत. त्यामुळे वार्डवासीयांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत वारंवार ग्रामपंचायतला कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या वार्ड क्रमांक दोनमधील महिलांनी ३ जुलैला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायत गाठली; परंतु ग्रामपंचायतमध्ये कोणीच हजर नसल्याने व केवळ ग्रामपंचायत उघडी असल्याने या त्रस्त महिलांनी चक्क ग्रामपंचायत बंद करुन तिला कुलूप लावून रोष व्यक्त केला.
सध्या डोणगाव ग्रामपंचायत अतिक्रमण, स्वच्छता, अनियमितता या कारणाने गाजत असतानाच याच ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक दोन मधील कौशल्या नगर येथे ऐन पावसाळ्यात रस्ते नसल्याने नागरिकांना या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने वार्डातील महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत गाठली; परंतु ग्रामपंचायत केवळ इमारत उघडी असून, कुणीच हजर नसल्याने महिलांंनी ग्रामपंचायतला कुलूप लावून रोष व्यक्त करीत आमच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतमध्ये जवळपास ५० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कुलूप ठोकून वरिष्ठांचे लक्ष वेधले, तर समस्या दूर न झाल्यास महिलांनी आणखी आंदोलन करु, असे सांगितले.