तंटामुक्तीच्या कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:39 AM2017-07-19T00:39:48+5:302017-07-19T00:39:48+5:30

जिल्हा कार्यालय दोन वर्षांपासून बंदच : पोलीस विभागाकडूनच अभियानाला खो !

Lockup to Tantamukti's office | तंटामुक्तीच्या कार्यालयाला कुलूप

तंटामुक्तीच्या कार्यालयाला कुलूप

Next

फहीम देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : लोकसहभागाची चळवळ असलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम २००७ मध्ये सुरू झाली. या अभियानाची दखल इतर राज्यांमध्येही घेतली गेली. बुलडाणा जिल्हा हा या अभियानात अग्रेसर राहिला. अनेक पुरस्कार या जिल्ह्याला मिळाले. मात्र सध्या हे अभियान पूर्णपणे गुंडाळल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून बुलडाणा येथून नियंत्रण केल्या जाणाऱ्या कार्यालयाला चक्क कुलूप लावण्यात आल्याने गावागावात तंटामुक्त अभियानाचे वांदे झाले असून तंटे वाढलेले आहेत.
राज्यात या योजनेवर अंमलबजावणी सुरु असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र या अभियानाला थांबा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात दोन वर्षांपूर्वीपर्यंत बुलडाणा जिल्हा अग्रेसर होता. २०१४ पर्यंत जिल्ह्यातील ८६७ पैकी ८५९ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याने जिल्हाभरातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने कमी होण्यास या अभियानाचे सहकार्य लाभले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक शामराव दिघावकर आणि लखमी गौतम यांनी महात्मा गांधी तुटामुक्त गाव अभियानाला जिह्यात यशस्वी करून दाखविले होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी यात सातत्य कायम न ठेवता मागील २ वर्षांपासून ज्या कार्यालयातून हे अभियान नियंत्रित केल्या जायचे तेच कार्यालय बंद करून टाकले. यामुळे या अभियानाचे बुलडाणा जिल्ह्यातील गावागावाते वांदे झाले आहे. त्याचे परिणाम वाढत्या गुन्हेगारींवर झालेले असून जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.
काही गावांमध्ये तर तंटामुक्त समित्यांमध्येच तंटा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. गावातील तंटे मिटविण्याऐवजी समिती स्वत:च वादात सापडल्याची उदाहरणे अनेक गावांमध्ये दिसून येत आहेत. समित्यांबरोबरच पोलीस व महसूल प्रशासनही या अभियानाबाबत सध्या गंभीर नसल्याची परिस्थिती आहे. महसूल व पोलिसच गंभीर नसल्याने अभियानाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

अभियानाचे निकष
शांततेतून समृध्दीकडे असे ब्रीद वाक्य असलेल्या या योजनेत सामंजस्याने गावपातळीवरील तंटे मिटविण्याची पध्दत आहे़ अभियानाच्या माध्यमातून दिवाणी, फौजदारी, महसूली आणि इतर तंटे सामोपचाराने मिटवण्यात येतात़ तसेच अभियानात गाव पात्र ठरण्यासाठी या अभियानाला काही नियम व अटी घालून दिल्या आहेत़ त्यानुसार या अभियानाला २०० गुण देण्यात आले असून त्यापैकी १५0 गुण मिळवलेले गावच या योजनेस पात्र ठरणार आहे़ पात्र ठरलेल्या गावाला २००१ च्या जनगणनेनुसार दर हजारी लोकसंख्येला १ लाख रुपये बक्षीस ठरविण्यात आले आहे़ याशिवाय गावाने १९० गुण प्राप्त केले तर त्या गावाला विशेष शांतता पुरस्कार देवून सन्मानित केले जाते आणि एकूण बक्षिसाच्या सुमारे २५ टक्के ज्यादा रक्कम दिली जाते़ याशिवाय या अभियानाला उत्कृष्ठ प्रसिध्दी दिल्यामुळे पत्रकारांना देखील राज्यस्तर, विभागस्तर आणि जिल्हास्तर अशा विविध स्तरावर बक्षीस देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे़ सध्या मात्र अभियान पूर्णपणे बंद पडले आहे.

पोलीस अधीक्षक मीना यांनी लक्ष देण्याची गरज!
मागील दोन वर्षापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक बाविस्कर रुजू होताच अधिकांश तंटामुक्त गाव मोहिमेचे कार्यालय बंद पडले. यातील नियुक्त कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यामुळे कुठल्याही पोलीस स्टेशनला ही समिती कार्यरत नाही.२ वर्षापासून बंद पडलेले तंटामुक्तीचे जिल्हा कार्यालय पोलीस अधीक्षक मीना यांनी योजनेचे फलित आणि गुन्हेगारांचा वाढता आलेख पाहता तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांकडून होत आहे.

Web Title: Lockup to Tantamukti's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.