टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:09 PM2020-05-27T12:09:31+5:302020-05-27T12:09:40+5:30
कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : सध्या एकीकडे कोरोना आजाराचा सामना सर्वजण करीत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर आता टोळधाड या कीटकांचे आव्हान उभे राहीले आहे. पिकांचे नुकसान करणाºया या कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.
गुजरात, मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली. संग्रामपूर तालुका कृषी विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुका कृषी विभागाने पेरणीपूर्वीच जनजागृती सुरू केली आहे. मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातपुडा परिसरातील सायखेडा, हडीयामाळ, चिचारी, शिवणी, दयालनगर, वसाळी, पिगळी, सोनाळा परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी १२ ट्रॅक्टरवर कॉमप्रेशर यंत्र बसविण्यात आले असून फवारणी करण्यात येणार आहे.
नेमकी कशी आहे टोळधाड
आपल्याकडे आढळणारा नाकतोडा या कीटकासारखाच हा कीटक आहे. यांचा थवा पिकांचा फडशा पाडतो. एका तासात सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतराच्या क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. सर्वच पिकांना हे हानीकारक आले. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी हे कीटक खातात. टोळ तांबुस रंगाची असते. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वास्तव्य करतात. एक किलोमीटर चौरस क्षेत्रात टोळ असेल तर ३ हजार क्विंटल टोळीचे वास्तव्य राहते, अशी माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
कसे आणणार नियंत्रण!
टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास नियंत्रण मिळविता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यानेही नियंत्रण मिळविता येते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथेल पॅराथीआॅन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयानी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावता येते.
गुजरात, मध्य प्रदेशात टोळधाडीचा जास्त प्रादुर्भाव आहे. सातपुडा पर्वत परिसरात टोळधाडीचा त्रास जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
- अमोल बनसोड,
तालुका कृषी अधिकारी
संग्रामपूर