लोणारात दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण
By admin | Published: October 9, 2016 01:53 AM2016-10-09T01:53:23+5:302016-10-09T01:53:23+5:30
नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात दांडियाचा रासरंग अधिकच बहरला.
लोणार(जि. बुलडाणा), दि. 0८- नवरात्रीच्या सातव्या दिवशी शहरात दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवात तरुणाईने गर्दी केल्याने उत्सवाच्या सातव्या दिवशी खर्या अर्थाने दांडिया उत्सव रंगला. शहरात नवरात्रोत्सवानिमित्त रामनगर, माउलीनगर, शिवाजीनगर, शिवाजी कॉलनी, ब्राह्मण गल्ली भागात सार्वजनिक मंडळांनी केलेल्या रोषणाईने शहर उजळून निघाले असून, काही ठिकाणी वेगवेगळ्या वाद्यांवर रंगलेला दांडिया आणि गरबा पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. दांडियासाठी तरुणाईमध्ये गुजराती वेशभूषेचे आकर्षण असल्याने विविध ठिकाणच्या गरबा दांडियांमध्ये गुजराती वेशभूषा आणि गुजराती संगीताची उत्साहात धूम दिसत आहे. तसेच हिंदी व मराठी चित्रपट गीतांसह व मराठी लोकगीतांच्या तालावर दांडिया खेळण्यात तरुणाई दंग झाली असून, टिपरीवर पडणारी टिपरी, दांडिया पाहण्यासाठी जमलेल्यांनाही रासलीलेमध्ये सहभागी होण्याचा मोह होताना दिसत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात हा रासरंग अधिकच बहरत जाण्याचे संकेत शहरातील विविध ठिकाणी रंगलेल्या गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून मिळत आहे. गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेने लेवून नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ झालेला आहे. तसेच दांडियाच्या जल्लोषालाही उधाण आलेले आहे. पूर्वीचा रास गरबा, दांडियाला धार्मिक स्वरूप होतं. त्यामुळे दांडिया मंदिराच्या मैदानात होत असे. त्यात कालानुरूप झालेले बदलही लोकांनी उत्साहाने स्वीकारले व त्यातूनच सध्याचं डिस्को दांडियाचं स्वरूप निर्माण झालं. पूर्वी दांडिया सणाच्या स्वरूपात साजरा केला जायचा. हडप्पाकालीन संस्कृतीमधे दांडियाचे पुरावे पहावयास मिळतात. त्यावेळी स्त्रिया शेतात पीक आल्यावर नाचत-गात अभिनयासोबत नृत्यही करायच्या. पुढे हाच दांडिया सामाजिक उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जाऊ लागला. साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी खेळला जाणारा रास गरबा हा धार्मिक स्वरूपाचा होता. तसेच त्याचे स्वरूपही छोटेखानीच असायचे. सध्या दांडिया खेळ्णार्यांचा जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.