Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघ; जुने खेळाडू, नवा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:53 PM2019-04-10T14:53:57+5:302019-04-10T14:54:04+5:30

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतील बुलडाणा मतदारसंघातील २०१९ च्या लढतीचे वर्णन करायचे झाल्यास ‘जुने खेळाडू, नवा डाव’ असेच करावे लागेल.

Lok Sabha Election 2019: Buldhana constituency; Old players, new innings! | Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघ; जुने खेळाडू, नवा डाव!

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघ; जुने खेळाडू, नवा डाव!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतील बुलडाणा मतदारसंघातील २०१९ च्या लढतीचे वर्णन करायचे झाल्यास ‘जुने खेळाडू, नवा डाव’ असेच करावे लागेल. २००९ च्या लढतीतील हे सहकारातील ‘हेवीवेट’ उमेदवार १० वर्षानंतर पुन्हा आमने-सामने उभे ठाकले आहेत. जुन्या तुल्यबळ नेत्यांमधील दुसऱ्या सामन्यात कोणाचा ‘निकाल’ लागणार, हा यक्ष प्रश्न जनसामान्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. प्रचाराच्या पूर्वार्धात तरी काँग्रेस आघाडीच्या आक्रमक व सुनियोजित प्रचार यंत्रणेमुळे भाजप-शिवसेना युती काहीशी बॅकफुटवर गेल्याचे चित्र असले तरी प्रचाराच्या उत्तरार्धात कमबॅक करण्याची संधीही त्यांना आहे.
२००९ मध्ये हे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्याला वेगळी पृष्ठभूमी होती. दीर्घकाळानंतर बुलडाणा मतदारसंघ ‘खुला झाला असतानाच खा. जाधव यांच्या पारंपरिक बालेकिल्ला असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघ ‘राखीव’ झाला. यामुळे ते राजकीयदृष्ट्या विस्थापित झाल्याच्या भावनेने त्यांच्याप्रति सामाजिक सहानुभूती निर्माण झाली. सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांना पक्षश्रेष्ठींमुळे ऐनवेळी मैदानात उतरावे लागले. या दोन मुख्य कारणामुळे शिंगणेंना त्यावेळी निसटत्या अर्थात केवळ २८ हजारांच्या फरकाने दिल्ली दरबारी जाता आले नाही.
मात्र आताच्या लढतीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अडचणीतील जिल्हा बँकेसाठी विशेष पॅकेजच्या मागणीवरून २०१४ ची विधानसभा लढविली नाही. यामुळे गेली ५ वर्षे ‘राजकीयदृष्ट्या विस्थापित’ असल्यामुळे सामाजिक सहानुभूतीचे वारे त्यांच्या दिशेने आहेत. याउलट सलग दोन वेळा अर्थात २००९ आणि २०१४ मिळालेल्या विजयामुळे प्रस्थापित झाल्याने, खा. जाधव यांच्याविरोधात ‘अ‍ॅन्टी इनकम्बन्सी’ हा घटक निवडणुकीतील न दिसणारा पण प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा आहे.
यामुळे सहानुभूती व सेनेच्या उमेदवाराविषयीच्या नकारात्मक लाटेवर स्वार झालेले माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचाराच्या रोख ‘स्थानिक विकासाचे मुद्दे व १० वर्षात रखडलेला विकास’ यावर आहे. उमेदवारासह काँग्रेस, स्वाभिमानी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (कवाडे), जनता दलाच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी यावरूनच खा. जाधवांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दुसरीकडे विजयाचा आत्मविश्वास व ‘हॅट्ट्रिक’च्या उंबरठ्यावर असलेले खा. जाधव व युतीने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्याची, देशाभिमान, राष्ट्रीय सुरक्षेची लढत असण्यावर भर दिला आहे. युतीने प्रचारात, पुलवामा एअर स्ट्राइक, अंतराळ मोहीम यावर फोकस केले आहे. खा. जाधव यांनी याला सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची व समृद्धी महामार्गाची जोड दिली आहे; मात्र बुलडाणा लोकसभेच्या इतिहासात श्रीराम राणे वगळता आजपर्यंत एकाही उमेदवारास हॅट्ट्रिक साधता आलेली नाही.
दुसरीकडे प्रचाराने वेग घेतला असताना आता उत्तरार्धात होणाºया शरद पवार, उद्धव ठाकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्या सभांमुळे वातावरण ढवळून निघणार आहे. वंचित आघाडीचा प्रचार सुरू असला तरी त्यात अपेक्षित जोर व नियोजन मात्र अभावानेच दिसून येते. त्यामुळे बुलडाण्यातील लोकसभेची लढत ही तशी दुरंगीच म्हणावी लागेल.

Web Title: Lok Sabha Election 2019: Buldhana constituency; Old players, new innings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.