Lok Sabha Election 2019 : ‘वंचित’ समोर नियोजनाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:11 PM2019-03-30T14:11:34+5:302019-03-30T14:11:39+5:30
सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एक अपवाद वगळता १९८० ते २००९ पर्यंत जिल्ह्याबाहेरच्या उमेदवारांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती; या उमेदवारांच्या यशामध्ये सर्वांना सोबत घेण्याची वृत्ती, स्थानिक प्रश्नांचा वेध घेण्याची क्षमता व सर्वात महत्वाचे म्हणजे नियोजन कौशल्य यांचा मोठा वाटा राहिल्याने हे उमेदवार कधी बाहेरचे वाटलेच नाही. या कसोटीवर सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून त्यांच्या नियोजनाचा गोंधळ उडाला असून अखेर त्यांना दूसरा निवडणूक अर्ज दाखल करण्याची धावपळ येनवेळी करावी लागल्याने या गोंधळावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांना नियोजनाच्या पातळीवरच सर्वाधीक वेळ देण्याचे आव्हान आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे व भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन हेवीवेट नेत्यांमध्ये लढत होत आहे. लढतीमध्ये वंचितच्या वतिने बळीराम सिरस्कार यांनी एन्ट्री केल्याने ही लढत तिरंगी होईल अशी चर्चा अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र चर्चा सिरस्कारांच्या कोलमडलेल्या नियोजनाचीच आहे. २२ मार्च रोजी आ.सिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी कमालीचा सावळा गोंधळ दिसून आला होता. सकाळी ११ वाजेपासून पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा कचेरी परिसरात त्यांची प्रतीक्षा करीत असताना ते अंतिम क्षणी म्हणजे पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. उमेदवारांसह पाच पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश असल्याने व त्यांचेही कोणतेच नियोजन नसल्याने जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे, भारिप नेते नगरसेवक मो.सज्जाद हे बाहेरच अडकले. हा गोंधळ एवढयावर न थांबता अर्ज सादर केल्यावरही कायम राहिला. त्यांनी अर्जात दिलेल्या १० पैकी २ सूचकांची नावे मतदार यादीतच नसल्याचे आढळून आले. यामुळे पुन्हा नव्याने कोरा अर्ज घेऊन अखेरच्या दिवशी भरला. नामांकन प्रक्रियेतच उडालेल्या या गोंधळाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली.
मुळातच सिरस्कार हे जिल्ह्याबाहेरील उमेदवार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांवरच त्यांची मदार राहणार आहे. गेल्यावेळचे राष्टÑवादीचे उमेदवार असलेले कृष्णराव इंगळे यांना मिळालेल्या मतांचे गणित डोळयासमोर ठेवून वंचित बहूजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली असली तरी कृष्णरावांचे ‘स्थानिक ’ नेतृत्व दूर्लक्षीत करता येणार नाही. नेमक्या याच मुद्यावर सिरस्कार बॅकफुटवर आल्याने पदाधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला आहे. त्यातच बुलडाणा मतदारसंघाचा विस्तार अफाट असल्याने त्यांची प्रचार करताना व प्रचाराचे नियोजन करताना चांगलीच दमछाक होत आहे. दूसरीकडे वंचित आघाडीकडे अनेक सक्षम पर्याय असताना आयात उमेदवाराला मिळालेल्या संधी मुळे स्थानिक नेत्यांमध्ये असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. ‘वंचित’ चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी पदाधिकारी सोबत दिसत असले तरी नेत्यांचे रुसवे फुगवे काढण्यातच त्यांचा सर्वाधीक वेळ जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नियोजनाची बाजु सक्षमपणे सांभाळत त्यांना दूरंगी लढतीला तिरंगी लढतीत परावर्तीत करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल एवढे मात्र निश्चीत!