Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:50 PM2019-04-08T12:50:44+5:302019-04-08T12:50:58+5:30

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे.

Lok Sabha Election 2019: election campaign; Meeting begins | Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू

Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. १६ एप्रिल रोजी प्रचार तोफा शांत होत असल्याने उरलेल्या अवघ्या नऊ दिवसामध्ये युती, आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या जवळपास १८ सभा जिल्ह्यात होत आहेत. दरम्यान, प्रचाराच्या पूर्वार्धात राजकारणामध्ये परस्परविरोधी टोकांवर असणारे युती व आघाडीच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. त्यामुळे अशा परस्परविरोधी धाटणीच्या नेत्यांद्वारे मतदारांचे कितपत परिवर्तन होईल, हाही निवडणुकीत चर्चेचा मुद्दा आहे.
आता स्टार प्रचारकांच्या माध्यमातून मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून केला जाणार आहे या स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाक ७ एप्रिलपासूनच सुरू झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी माजी मंत्री फौजिया खान यांची बुलडाण्यात सभा झाली, तर शिवसेना नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची मेहकर, साखरखेर्डा येथे ८ एप्रिल रोजी सभा होत आहे. मेहकरातही वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेने सुरुवात केली जाणार आहे. त्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून १० एप्रिल रोजी खामगावात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांचीही जाहीर सभा घेतली जाणार आहे. त्यानंतर १५ एप्रिललाही वंचित बहुजन आघाडीकडून एक महत्त्वाची जाहीर सभा घेतली जाण्याची शक्यता भारिप-बमसंच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, आघाडीकडून पुढील काळात १२ एप्रिल रोजी खामगावमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल. दहा एप्रिल रोजी नितीन बानगुडे पाटील यांची वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथे सभा होणार आहे. त्यापाठोपाठ प्रचार तोफा थंडावण्याच्या एक दिवस अगोदर चिखलीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्याही येत्या काळात सभा होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री फौजिया खान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे आणि शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होणार आहे.  
प्रचारात विकास आणि अकार्यक्षमतेचेच मुद्दे
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात युतीकडून ‘मोदी आणि विकास’, महामार्ग, सिंचन सुविधा, रेल्वे आणि एयर स्टाइक तथा स्पेस स्ट्राइक हे मुद्दे घेऊनच प्रचार केला जात आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपल्याला निवडून देण्यात यावे असा युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याकडून प्रचार होत आहे. आघाडीकडून विद्यमान खासदार असलेले जाधव यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवण्यात येत आहे. ही अकार्यक्षमता पाहता यंदा परिवर्तन निश्चित असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षात मोदींनी सामान्यांची केवळ फसवणूकच केली. त्यामुळे जनसामान्यांच्या कल्याणासाठी आघाडीला निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही कॉर्नर सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करत आहेत.
प्रचार पातळी घसरतेय
पूर्वाधातील प्रचारादरम्यान कॉर्नर बैठका व मतदारांशी थेट संवाद साधल्या गेला असला तरी काही ठिकाणी छोटेखानी सभा झाल्या आहेत. यामध्ये आघाडीकडील एक व युतीकडील दोघांनी प्रचारादम्यान खालच्या पातळीवर परस्परविरोधी टीका-टिप्पणी केली. निवडणूक रिंगणातील उमेदवार राहिले बाजूला; पण या सहकाऱ्यांनी प्रचारादरम्यान जीभेला लगाम लावणे गरजेचे झाले आहे. व्यक्तिगत स्तरावर जाऊन होणाºया या टीका-टिप्पणीची तीव्रता स्टार प्रचारकांच्या सभेदरम्यान प्रसंगी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेहकर नगराध्यक्षांविरोधात आधीच असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: election campaign; Meeting begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.