Lok Sabha Election 2019 : भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 02:23 PM2019-04-09T14:23:10+5:302019-04-09T14:23:16+5:30
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस लावण्याच्या हालचाली सुरू असून त्यामुळे या पथकांनाही आपले कर्तव्य काळजीपूर्वक निभवावे लागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, लेखा पथक या मुख्य पथकांचा समावेश आहे. या पथकाकडून त्यांच्या कर्तव्याचे पालन केले जाते किंवा नाही, यावर जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्ण लक्ष ठेवून आहे. त्यासाठी या पथकाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा व जळगाव जामोद या तीन विधानसभा मतदार संघातील भरारी पथकांच्या २३ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्यामध्ये चिखली विधानसभा मतदार संघातील सात वाहने, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील १० व जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सहा वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाच्या हालचाली सध्या सुरू आहेत.