Lok Sabha Election 2019 : तीर्थक्षेत्र विकासाच्या आश्वासनांचा दुष्काळात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:22 PM2019-04-08T13:22:53+5:302019-04-08T13:23:01+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्याला तीर्थक्षेत्रांचे वैभव लाभलेले आहे. अनेक हेमाडपंती शिव मंदिराचा मौल्यवान वारसाही जिल्ह्यात पाहावयास मिळतो. परंतू तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडलेल्या गेलेली तीर्थक्षेत्रे सोयीसुविधांनी युक्त असावी, यासाठी अनेक दिवसांपासून भक्तांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तर काही ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील काही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जवळपास प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरुन केली जावू शकतात. तीर्थक्षेत्र परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, भक्तनिवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकासकामे मंजूर आहेत. तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही कामांना मुहूर्त का मिळत नाही, असा सवालही भक्तवर्गांमधून होत आहे.
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या यात्रा, उत्सवामध्ये राजकिय लोकांना प्राधान्य दिल्या जाते. त्यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करणे, त्यांचे भाषण ठेवली जातात. त्यामुळे यासारख्या धाार्मिक कार्यक्रमातूनही लोकप्रतिनिधी राजकारणाची पोळी भाजून घेतात. तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचे आश्वासन दिल्यानंतर परत तो लोकप्रतिनिधी त्या तीर्थक्षेत्राकडे वर्षभर फिरकूनही पाहत नाही. मध्यंतरी ज्या तीर्थक्षेत्रासाठी विकास निधी मंजूर झाला होता, तो कामासाठी वळती करण्यात जीएसटीचा खोडा निर्माण झाला होता. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची गरज भक्तांमधून व्यक्त होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यामधून पंढरपूर, पैठण, आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांची भरपूर संख्या आहे. मात्र या वारकरी भाविकांना मिळणाºया सोयीसुविधा खूपच अल्प प्रमाणात आहेत. वाटचालीच्या मार्गातल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. या सर्व समस्या सोडविणे आवश्यक आहे.
- गोपाल महाराज पितळे, सदस्य
राज्य कार्यकारीणी, वारकरी महामंडळ
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हे भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. परंतू या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरून कामे होणे आवश्यक आहे. पंढरपूर, आळंदी येथे जाणाºया वारकºयांची संख्या लक्षात घेता वारकºयांच्या दृष्टीनेही शासनाकडून प्रयत्न करण्यात यावे.
- लक्ष्मण महाराज देशमुख,
आळंदीकर (घटनांद्रा, ता. मेहकर).