Lok Sabha Election 2019 : ग्रामीण, शहरी मतदार कोणाला तारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:11 PM2019-04-02T14:11:04+5:302019-04-02T14:11:12+5:30

बुलडाणा: गेल्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा १७ व्या लोकसभेची निवडणूक काहीशी वेगळी असल्याने बुलडाणा लोकसभा मतदान संघातील विधानसभा निहाय चित्र कसे राहिल, याबाबत उत्सुकता लागून आहे.

Lok Sabha Election 2019: Who will earn rural, urban votes | Lok Sabha Election 2019 : ग्रामीण, शहरी मतदार कोणाला तारणार!

Lok Sabha Election 2019 : ग्रामीण, शहरी मतदार कोणाला तारणार!

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा १७ व्या लोकसभेची निवडणूक काहीशी वेगळी असल्याने बुलडाणा लोकसभा मतदान संघातील विधानसभा निहाय चित्र कसे राहिल, याबाबत उत्सुकता लागून आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करताना संबंधीत विधानसभा मतदार संघांमध्ये आमदारांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. गेल्या २० वर्षापासून युतीच्या खात्यात बुलडाणा लोेकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे यंदा जनाधार कुठल्या बाजूला झुकतो, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, असे असले तरी सध्या जनमानसाच्या मनाचा ठाव घेणे काहीसे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता आघाडी आणि युतीमध्ये काट्याची टक्कर असल्याचे स्पष्ट होत आहे. जवळपास एका दशकानंतर आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे निवडणूक रिंगणात उतरले असून युतीकडून शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे भाग्य आजमावत आहे. २००९ च्या निवडणुकीत बसपा फॅक्टर जिल्ह्यात बर्यापैकी चालला होता. त्या पृष्ठभूमीवर यंदा वंचीत बहुजन आघाडीचा फॅक्टर कितपत मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होतो व त्यातून होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते यावर बुलडाणा लोकसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.
दुसरीकडे आघाडी विरोधात युती ही तुल्यबळ लढत यंदाही जिल्ह्यात होत असून २०१४ च्या निवडणुकीत शहरी भागात उभय बाजूंनी काट्याची टक्कर झाली होती. मात्र ग्रामीणमध्ये महायुतीला मतदारांनी तारले होते. त्यामुळे २०१४ च्या लाटेमध्ये मोठे मताधिक्य घेऊन विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी आपला दुसरा विजय साजरा केला होता. मात्र आता आघाडीतर्फे त्यांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे दहा वर्षाच्या अवकाशानंतर मैदानात उतरले आहे. त्यामुळे यंदांचे चित्र काहीसे वेगळे राहील असा अंदाज वर्तविल्या जात आहे. २००९ मध्ये प्रदीर्घ कालवधीनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ खुला झाला होता. त्यामुळे त्यावेळची राजकीय व सामाजिक समिकरणे काहीशी वेगळी होती. २०१४ ला लाटेचा प्रभाव होता. आता या दोन्ही बाबी इतिहास जमा झाल्या आहेत. तुल्यबळ लढतीत प्रयत्नाची शिकस्त, जनमानसापर्यंत पोहोचण्यात युती, आघाडीतील उमेदवार कितपत यशस्वी ठरतात यावरच त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. परिणामस्वरुप युतीच्या चार आणि आघाडीतील एक पक्ष असलेल्या काँग्रेसचे दोन आमदार यांच्या खांद्यावर युती, आघाडीच्या उमेदवारांसाठी मते मागण्याचे ओझे येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार्या आमदारांचा निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे.
युतीला लावाव लागणार जोर
शहरी भागातील मतदारांना आपलेसे करण्यासाठी युतीच्या उमेदवाराला सिंदखेड राजा, लोणार, खामगाव , मेहकर आणि मोताळ््यात जोर लावावा लागणार असतानाच आघाडीच्या उमेदवाराला बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा शहरात जोर लावावा लागणार आहे. २०१४ मधील आकडे त्यादृष्टीने बोलके आहेत.
मताधिक्य टिकविण्यासाठी कसरत
२०१४ च्या निवडणुकीत युतीला सहा विधानसभा मतदार संघात मिळालेले मताधिक्य टिकविण्यासाठी तेथील युतीच्या आजी, माजी आमदारांना कसब पणाला लावावे लागणार आहे तर आघाडीच्या उमेदवाराल २००९ मधील मताधिक्य आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी आघाडीच्या आजी, माजी आमदारांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यातच मतविभाजन टाळून अधिकाधिक जनाधार आपल्या बाजूने कसा वळविता येईल,यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Who will earn rural, urban votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.