आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
By सदानंद सिरसाट | Published: April 21, 2024 10:55 PM2024-04-21T22:55:28+5:302024-04-21T22:56:20+5:30
महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ खामगावातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते.
खामगाव : सध्याची लढाई हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे, या परिस्थितीत ज्या शिवसेना नामक आईच्या पदराखाली वाढला, मोठा झाला, त्याच आईच्या कुशीवर वार करणारा बुलढाणा लोकसभा निवडणुकीत उभा आहे, आईच्या भगव्याशी गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक तयार आहे, असे आव्हान शिवसेना प्रमुखउद्धव ठाकरे यांनी येथे दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ खामगावातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, संपर्क प्रमुख आशिष दुआ, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या निवडणूक काळात भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात सोयाबीन, कापसाला मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांना नागडे करण्याचा प्रकार सुरू आहे. गरज नसताना गोंधळातून कापूस-सोयाबीनचे आयात-निर्यात धोरण केंद्रात बदलवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचेही ठाकरे म्हणाले.
सभांमध्ये जयभवानी म्हटले, यावरून निवडणूक आयोगाने आपल्याला नोटीस दिली. त्याचवेळी भाजपचे नेते हनुमान, रामलल्लाचे नाव घेऊन प्रचार करतात. त्यांचे आयोगाने काहीच केले नाही. हा दुटप्पीपणा आहे. जय भवानी-जय शिवाजी ही घोषणा आमच्या रक्तात आहे, त्यामुळे काल, आज आणि उद्याही जयजयकार करणार आहे, आयोगाने हिंमत असेल तर कारवाई करावी, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे म्हणत पंतप्रधान मोदी कारभार करतात. प्रत्यक्षात हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मांडीवर घेतात. त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देतात, याचा अर्थ भ्रष्टाचारी असलेल्या दुसऱ्यांच्या हातून खाणे सुरू असल्याचे स्पष्ट होते, असा आरोपही ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाशिमच्या ताईची चौकशी सुरू झाली, त्यांच्या पक्षात गेल्यानंतर पुढे सर्वच थांबले. प्रफुल्ल पटेल यांच्यावर इक्बाल मिर्चीसोबतच्या संबंधाबाबत आरोप झाले. पक्षात आल्यानंतर तर त्यांना मिठीच मारली, यातून पंतप्रधान मोदींचा खरा चेहरा उघड होतो, असेही ठाकरे म्हणाले.
- पक्ष, चिन्ह, वडीलही चोरले...
फोडाफोडी करून पक्ष, चिन्ह एवढेच नव्हे तर वडीलही चोरले. तरीही गद्दारांना आणि भाजपला जनतेने स्वीकारले नाही. त्यामुळेच त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यात सभा घेण्याची गरज पडत असल्याचे सांगत असली आणि नकली शिवसैनिक कोण आहेत, हे आमचे मावळे दाखवून देतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
- न ऐकणारांना जेलची हवा
भाजपच्या काळात भ्रष्टाचार केला म्हणून नव्हे तर न ऐकणारांना जेलमध्ये टाकले जात आहे. त्याचवेळी त्यांना घाबरलेल्या भ्रष्टाचाऱ्यांच्या गळ्यात गळा घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे हुकूमशाही आहे. त्यातूनच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरूंगात टाकले आहे. ही हुकूमशाही मोडण्यासाठी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले.