लोणार शहरात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २० बोअर अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:32 PM2018-05-08T14:32:41+5:302018-05-08T14:32:41+5:30
लोणार : सध्या कडक उन्हाळा सुरु असून शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोणार नगर परिषदेने २० बोअर अधिग्रहीत केले आहे.
लोणार : सध्या कडक उन्हाळा सुरु असून शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोणार नगर परिषदेने २० बोअर अधिग्रहीत केले आहे. बोअरच्या ठिकाणी टाकी लावून नळाच्या तोट्यांद्वारे पाणी वाटप होत करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या चेहºयावर आनंद दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विदर्भ व मराठवाडा हा कायम टंचाईग्रस्त भाग असतो. दरवर्षी उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होते. भर उन्हात डोक्यावर हंडा घेऊन महिला पाण्यासाठी निघाल्याचे चित्र दरवर्षीच दिसून येते. लोणार शहर विदर्भ- मराठवाड्याच्या सिमेवर आहे. येथून काही अंतरावरच मराठवाडा लागतो. यावर्षी तसेही लोणार परिसरात पर्जन्यमान कमी झाले. त्यातच पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाºया धरणाने तळ गाठला आहे. जलाशयांची पातळी खालावल्याने शहरात ऐन मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोणार नगर परिषदेने शहरातील २० बोअर अधिग्रहण केले आहे. बोअर असलेल्या ठिकाणी लोखंडी स्टँड बनवून त्यावर नळाच्या तोट्या बसविलेल्या टाकी ठेवण्यात आल्या आहेत. या टाकींद्वारे चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याने पाण्यासाठीची भटकंती थांबेल असे दिसून येत आहे. नगराध्यक्ष भूषण मापारी यांच्या उपस्थितीमध्ये ७ मे रोजी पाणी पुरवठा सभापती शेख गफ्फार शेख कादर यांच्या हस्ते पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिंदे, बादशाह खान, साहेबराव पाटोळे, बांधकाम सभापती प्रा.सुदन कांबळे, नगरसेवक शेख समद शेख अहमद, ज्ञानेश्वर मापारी यांची उपस्थिती होती.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ठिकठिकाणी लावलेल्या पाण्याच्या टाकीवर शांततेत पाणी भरून पाण्याचा अपव्यय टाळावा. -शेख गफ्फार शेख कादर पाणी पुरवठा सभापती , नगर परिषद ,लोणार