गुटखा विक्रीचे केंद्र बनतेय लोणार, पोलिसांपुढे मोठे आव्हान
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 2, 2022 06:27 PM2022-09-02T18:27:31+5:302022-09-02T18:28:44+5:30
दोन मोठ्या कारवाया, परंतू बाहेरच्या पोलीसांकडून
बुलडाणा : जिल्ह्यात लोणार शहर हे अवैध धंद्याचे तसेच गुटखा विक्रीचे केंद्र बनत आहे. याठिकानी तीन महिन्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफिया विरुद्ध दोन मोठ्या कारवाया बाहेरील पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु ह्याच कारवाया लोणार पोलिसांना का करता आल्या नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
लोणार येथे अवैध धंदे तसेच गुटखा विक्री जोमात सुरु आहे. काही महिन्यापूर्वी स्थानिक गुटखा माफियांविरुद्ध मराठवाड्यातील शेलु मानवत पोलिसांनी २१ जून च्या रात्री दरम्यान मोठी कारवाई केली होती. यामध्ये शेलु पोलिसांनी एका शेतातील गोठ्यावर टाकलेल्या छाप्यात जवळपास १९ लक्ष ७७ हजार ६०० रुपये गुटखा घटनास्थळा वरुण ताब्यात घेतला होता. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर ही लोणार शहरात आणि तालुक्यात अवैध गुटखा विक्रीचे मोठे नेटवर्क हे कार्यरतच राहिले. २१ जून २०२२ रोजी जिल्ह्याबाहेरील पोलिसांनी शहरात येवुन केलेल्या कारवाई नंतरही अवैध गुटखा विक्रीला लोणार पोलिस प्रशासनाने बळ दिल्यामुळे शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे. सहाय्यक जिल्हा पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांनी सुद्धा सापळा रचून मध्यप्रदेश मार्गे लोणारकडे गुटखा घेवून येणाऱ्या एका ट्रकला मेहकर शहरातील लोणार बायपासवर पकडले. यामधुन जवळपास २५ लक्ष रुपयांचा गुटखा ताब्यात घेवून गुटखा माफ़ियाविरुद्ध मोठी कारवाई केली. मात्र या दोन्ही कारवायामध्ये खरा गुटखा किंग पोलिसांच्या हाताला लागलाच नाही.
आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी सन समोर आहे. शहरात चोरी छुप्या पद्धतीने सुरु असलेले अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात बिट अंमलदारांना सर्व सूचना केल्या आहे.
- प्रदीप ठाकुर, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन लोणार.
काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात
लोणार शहरातील अवैध धंद्याना पोलिस प्रशासनाची मूक संमती असून पोलिस विभागच्या आशीर्वादाने तालुक्यात २ क्लब, २६ चकले, ६ वर्लीचे अड्डे, प्रतिबंधित गुटखा विक्री, दारू विक्री यासह अनेक अवैध धंदे सुरु आहे. सात दिवसाच्या आता लोणार तालुक्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन जिल्ह्या पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालया समोर करण्यात येणार आहे.
- राजेश मापारी, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.