लोणार येथे कोविड योद्ध्यांनाच कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:12+5:302021-03-09T04:37:12+5:30
येथील कर्मचारीच कोविड ग्रस्त होत असल्याने रुग्णसेवा देणारे अधिकारी, कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. या सेंटरवर कार्यरत दोन परिचारिका, एक ...
येथील कर्मचारीच कोविड ग्रस्त होत असल्याने रुग्णसेवा देणारे अधिकारी, कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. या सेंटरवर कार्यरत दोन परिचारिका, एक लॅब टेक्निशिअन व स्वॅब नमुने घेणारे अधिकारी असे अत्यंत महत्त्वाचे काम करणारेच कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. उर्वरित काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना सदृश लक्षणे आढळले आहेत. एकीकडे कोरोना लसीकरण सुरू असून दुसरीकडे आरोग्यसेवा देणारेच पॉझिटिव्ह येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिक सुध्दा कोरोना संदर्भात नियमावली पाळत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त ताण या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत आहे. सध्या शहरातील व तालुक्यातील सुपरस्प्रेडरचे स्वॅब नमुने मोठ्या प्रमाणात येथील कोविड सेंटरवर घेतले जात आहे. या चाचण्या करण्यासाठी अगदी १२ ते १६ तास आरोग्य यंत्रणा राबत आहे. येथे भरती असलेल्या रुग्णांना सुध्दा योग्य उपचार व सेवा सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा तहसीलदार सैपन नदाफ यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोज शहा, कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांचेसह कोविड सेंटरचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तारेवरची कसरत करताना दिसून येत आहेत.
आठवडी बाजार फक्त कागदोपत्रीच बंद!
सोमवार आठवडी बाजाराचा दिवस असतो. प्रशासनाने बाजार बंद ठेवला. परंतु तरी सुध्दा शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या संख्येने दुकाने लावल्याचे दिसत होते. त्यामुळे फक्त नावालाच बाजार बंद होता, गर्दी मात्र कायम होती.