लोणार नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर
By Admin | Published: September 29, 2016 01:41 AM2016-09-29T01:41:22+5:302016-09-29T01:41:22+5:30
१0 ऑक्टोबर रोजी दोन पदांसाठी होणार निवडणूक.
लोणार(जि. बुलडाणा), दि. २८- नगरपालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी होता. सदर कालावधी नुकताच संपुष्ठात आल्यामुळे लोणार नगर पालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी जाहीर केली. १0 ऑक्टोबर रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे लोणार नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक लक्षात घेता, गेल्या दोन महिन्यांपासून लोणार नगरपालिकेमधील राजकीय वातावरण गरम झाले आहे. याचे कारण म्हणजे अध्यक्ष पदाचा अडीच वर्षांंचा कालावधी संपल्याने होणार्या निवडणुका आहेत. याबाबत नगरसेवकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झालेली असतानाच २८ सप्टेंबर रोजी लोणार नगरपालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला.
यामध्ये अध्यक्षपदासाठी नामनिर्देश दाखल करण्यासाठी ३ ते ४ ऑक्टोबर २0१६ च्या दुपारी दोन वाजेपर्यंत कालावधी असून, वैध उमेदवारीची यादी ६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करणे, तसेच नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ७ ऑक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे.
निवडणूक प्रक्रिया ही १0 ऑक्टोबर २0१६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यासोबतच नगरपालिका उपाध्यक्षपदाचीसुद्धा निवडणूक प्रक्रिया होणार असून, उपाध्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करणे, १0 ऑक्टोबरच्या सकाळी १0 ते १२ वाजेपर्यंत वेळ आल्यास निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी नगरपालिका यांना दिले आहेत. या निवडणुकीचे काम उपविभागीय अधिकारी हे पाहणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेमुळे लोणार शहरामध्ये राजकीय वातावरण गरम झाले आहे. लोणार नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळय़ात पडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.