दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 12:46 AM2023-12-09T00:46:10+5:302023-12-09T00:47:01+5:30
विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे.
लोणार : जिल्ह्याचे नव्हे, तर जागतिक वैभव असलेल्या लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला नोव्हेंबर २०२० मध्ये प्राप्त झालेला ‘रामसर’ दर्जा धोक्यात आला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर फेरमूल्यांकन करण्यासाठी आलेल्या चेन्नई येथील पाच संशोधकांच्या पथकाच्या प्रमुख डॉ. काकोली बॅनर्जी यांनी हा संकेत दिला आहे. या युनिक वेटलॅण्डची दुरवस्था पाहून त्यांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला. नबीच्या नाल्यातून सरोवरात जाणारे सांडपाणी प्रामुख्याने यास जबाबदार असल्याचे मत संशोधकांचे आहे.
विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. निरीनेच त्याची निर्मिती केली होती. नागपूर खंडपीठामध्येही दाखल एका प्रकरणात वारंवार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरीही त्याचे काय आम्हाला, अशी मानसिकता बनली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करताना निरीने भविष्यातील लोणार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच कमी क्षमतेच्या या प्रकल्पाचे बांधकाम केल्याचा सूर आहे. शहराची आज ४० हजार लोकसंख्या झाली आहे. लोणार शहरात होणाऱ्या पाण्याच्या वापरापैकी ६५ टक्के सांडपाणी नबीच्या नाल्याद्वारे पूर्वीही आणि आताही जात आहे.
या नाल्यावरील सांडपाणी विशिष्ट वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने १४ टँकमध्ये जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतरत्र पंपाद्वारे उपसा करण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे काही येथे होत नाही. उभारण्यात आलेला प्रकल्प कुचकामी असून पाऊस पडल्यानंतर येथील पाणी अेाव्हर फ्लो होऊन घाणीसह हे सांडपाणी सरोवरात जातच आहे.
जैवविविधतेवर विपरीत परिणाम -
सरोवरात जाणाऱ्या या सांडपाण्यामुळे विवरातील दुर्मीळ जैविक संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच सरोवराच्या पाण्याचा पीएचमध्येही फरक पडत आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही निरीच्या ताब्यात आहे की पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे, याबाबत संभ्रम आहे. जबरदस्तीने तो पालिकेकडे दिला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पावर देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च झाला असून प्रकल्पातील पाणी उपसा करून नेमके कोठे सोडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.
नबीच्या नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नियमीत मोठ्या प्रमाणावर घाण सरोवरात जात आहे. त्यामुळे या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्थेवर आघात हो असल्याचे प्राथमिक स्तरावरील पहाणीत आढळून आले आहे. या रामसर वेटलॅन्ड साईटचे संवर्धन गरजेचे आहे.
डॉ. काकोली बॅनर्जी, संशोधक, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेटमेंट (चेन्नई)