लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 03:38 PM2020-01-05T15:38:48+5:302020-01-05T15:38:57+5:30
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/लोणार: आगामी २० वर्षातील विकासाचा विचार करून लोणार सरोवर विकासाचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी महसूल व लोणार पालिकेस दिले आहेत.
नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाची माहिती व करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चार जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी लोणार येथे भेट दिली होती. त्यावेळी वनविभाग, महसूल, पालिका, पुरातत्व, पर्यटन आणि अन्य संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेऊन उपरोक्त सुचना दिल्या. सोबतच न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही यांनी यंत्रणेला दिली. दुसरीकडे लोणार-मंठा बायपास करीता एमएसआरडीसीने तातडीने भूसंपादनाची कार्यवाही करावी, पालिकेने नेरी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले.
बेसलाईन सर्व्हे आठवड्यात पूर्ण करणार
लोणार सरोवर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका आठवड्याच्या आत बेसलाईन सर्व्हे प्रशासकीय यंत्रणे पूर्णत्वास नेऊन तो सादर करावा, असे निर्देशच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या बैठकीत दिले.सरोवर विकासासाठी करण्यात येणारी कामे ही परिणामकारक व गुणवत्ता ठेवून करावी, असे सांगत या कामात कुचराई नको असे स्पष्ट संकेतच दिले.