दोन हजार एकर जमिनीचा शोध सुरू
By admin | Published: September 24, 2015 01:23 AM2015-09-24T01:23:04+5:302015-09-24T01:23:04+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील दान दिलेल्या जमिनीपैकी सव्वा दोन हजार एकर जमिनीचा शोध लागत नसल्याचे समोर आले आहे.
नांदुरा (जि. बुलडाणा) : सामाजिक जाणिवांना नवा आयाम देणार्या तसेच १९५१ मध्ये विनोबा भावेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्यातील दात्यांनी दान दिलेल्या साडेचार हजार एकर जमिनीपैकी सव्वा दोन हजार एकर जमिनीचा शोध लागत नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आता या जमिनीचा शोध लावून तिची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात नांदुरा येथे राज्य शासनाच्या विदर्भ भूदान यज्ञ मंडळाचे आयोजन २२ सप्टेंबरला श्रीगुरुदेव सेवाश्रमात करण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यात ४ हजार ५00 एकर शेती ही भूदानाची असून, फेब्रुवारी २0१५ पासून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंंंत २ हजार २७९ एकर जमिनीचा शोध लागला असल्याचे या मेळाव्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उरलेली २ हजार २२१ एकर जमीन शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे या मेळाव्यादरम्यान उपरोक्त जमिनीचा थांगपत्ता लागत नसल्याचेही समोर आल्यानंतर काही वहिवाटदारांनी कथित स्तरावर सरकारी कर्मचार्यांना हाताशी धरून भोगवटदार वर्ग-२ ची ही जमीन वर्ग-१ ची करून विकून टाकली असल्याची माहिती चर्चेदरम्यान समोर आली. सोबतच अशी विक्री करणार्या व त्यांना सहकार्य करणार्या कर्मचार्यांवर कारवाई केली जावी, असा सूरही २२ सप्टेंबरच्या या मेळाव्यात निघाला. विनोबा भावेंच्या प्रेरणेने भूमिहिनांना दिलेल्या जमिनीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने विदर्भ भूदानयज्ञ मंडळाचे आयोजन केले आहे. नांदुरा खुर्द येथील श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण नारखेडे (नांदुरा), चांगेफळ येथील केशवराव पाटील, जळगाव जामोदचे भीमराव पाटील, अकोला येथील वसंतराव केदार, तर खामगाव येथील रामभाऊ बोराडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी यावेळी भूदानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये ५00 पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. भूदानाच्या अनेक लाभार्थ्यांंंंनी शासकीय कर्मचार्यांना हाताशी धरून मिळालेला भूदान पट्टा विकलेला आहे. वास्तविक, त्याची विक्री करता येत नाही. तो वडिलोपार्जीत वारसदारांना मिळत असतो. अनेक गावांमध्ये भूदानात मिळालेल्या शेतीवर आता वाढत्या किमतीमुळे प्लॉटिंग झाल्याचे समोर आले आहे.