शेडनेट उडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:16+5:302021-07-10T04:24:16+5:30
सावखेड तेजन येथील सुरेश किसन मांटे यांची गट नं. ८९ मध्ये ४९ आर शेती आहे. त्यापैकी २० आर क्षेत्रावर ...
सावखेड तेजन येथील सुरेश किसन मांटे यांची गट नं. ८९ मध्ये ४९ आर शेती आहे. त्यापैकी २० आर क्षेत्रावर कृषी विभागाच्या पाेकरा योजनेअंतर्गत ठेकेदारामार्फत शेड नेट उभारुन त्यात १० गुंठे क्षेत्रावर मिरची तर १० गुंठे कोबीची लागवड केली होती. शेडनेट उभारणीसाठी आगाऊ रक्कम व बियाणे, रोपटी यासाठी त्यांनी उधारी उसनवारी करीत आर्थिक जुळवणूक केली होती. शेडनेट उभारुन लागवड केल्यानंतर मिरची व कोबीचे पीक वाढीला लागत असतांनाच ७ जुलै, बुधवारी दुपारी ४.३० वा. सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाला़ शेडनेटमध्ये वारे शिरल्याने विशेष कापडाचे छत फाटून जाऊन उडून गेले. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करीत, भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
शेडनेटच्या गुणवत्तेची तपासणीची मागणी
पाेकरा योजनेत गावाचा समावेश झाल्यावर शेडनेट उभारणीचे काम कृषी विभागामार्फत ठेकेदाराकडून केले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल केली जाते. नैसर्गिक संकटांचे पूर्वनियोजन करुन शेडनेट मजबूत करणे आवश्यक असते. मात्र सावखेड तेजन येथील शेडनेट उडून गेल्यामुळे त्याची उभारणी व वापरलेल्या साधनसामग्रीच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचीही तपासणी व चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.