पाणी शेतात साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:37+5:302021-06-28T04:23:37+5:30
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे व उन्हाळ्यात कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी नियोजन न केल्याने मेहकर तालुक्यातील फर्दापूर, गवढांळा, कंबरखेड, बाभूळखेड, चायगावसह महामार्गाला ...
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे व उन्हाळ्यात कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी नियोजन न केल्याने मेहकर तालुक्यातील फर्दापूर, गवढांळा, कंबरखेड, बाभूळखेड, चायगावसह महामार्गाला लागून शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, जमिनीचे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचल्याने नुकसान झाले आहे. २५ जून रोजी आ. रायमुलकर यांनी फर्दापूर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अधिकारी व कंत्राटदारासह नुकसानग्रस्त शेतकरी हजर होते. यावेळी आ. रायमुलकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या. यापूर्वी वेळीच नियोजन केले असते, तर नुकसान झाले नसते. महामार्गाला विरोध नाही. मात्र, या चुकांमुळे बळिराजाचे नुकसान सहन केले जाणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा तत्काळ सर्व्हे करा, असे निर्देशसुद्धा यावेळी देण्यात आले, तर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी पांडे व किशोर यांनी सर्व्हे अहवाल आल्यावर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यापुढे नुकसान झाले तर काम बंद पाडण्याचा इशारा
यापुढे असे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी यावेळी दिला. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे उपविभागीय अधिकारी संतोष ईखार, हायवे इंजिनिअर दि. स. अंभोरे, रितेश सिन्हा, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ अधिकारी रामराव चनखोरे, नितीन बोरकर, तलाठी लक्ष्मण सानप, प्रसाद, विलास आखाडे, फिरोज शहा यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.