आग लागून लाखोंचे नुकसान
By Admin | Published: April 1, 2017 02:00 AM2017-04-01T02:00:48+5:302017-04-01T02:00:48+5:30
अचानक लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
लोणार, दि. ३१- शहरातील माउली नगरमध्ये राहत असलेल्या कृ.बा.स.सेवानवृत्त झालेल्या भास्कर घायाळ यांच्या राहत्या घराला ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात घायाळ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक कृ.बा.स. मधून सेवानवृत्त झालेल्या भास्कर घायाळ यांनी जीवनभराची पुंजी गुंतवून शहरातील माउली नगरमध्ये घर बांधलेले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महिला घरातील कामे करण्यात व्यस्त असताना अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वच एकदम गोंधळून गेले. आग विजविण्यासाठी काय करावे, हे समजण्याच्या आत आगीने रोद्र रूप धारण केले. शेजारधर्म पाळत काहींनी लोणार नगर परिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला. लोणार नगर परिषद अग्निशमन दलाने कार्य तत्परता दाखवत घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी भास्कर घायाळ यांची भेट घेऊन त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. तहसीलदार सुरेश कव्हळे यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन पंचनामा करून योग्य ती मदत देण्याबाबत चर्चा केली. शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनीही आपदग्रस्त कुटुंबाला भेट देऊन मदत देण्याचे आश्वासन दिले.