शासकीय कर्मचाऱ्यांकडून ड्रेसकोडला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:11+5:302021-01-09T04:29:11+5:30
शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर २०२० पासून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. शासनाच्या नवीन ...
शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर २०२० पासून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. शासनाच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार टीशर्ट, जीन्स, रंगीबेरंगी कपडे घालता येत नाहीत; परंतु बुलडाण्यात या नियमाची अंमलबजावणी होत नाही.
गडद रंगाचे कपडे कायम
जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये गडद रंगाचे कपडे परिधान केलेले अनेक कर्मचारी दिसून आले. गडद रंगाचे व चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत, असा आदेश आहे; परंतु त्याची फारसी अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होत नाही.
निवडणूक विभागातही उल्लंघन
जिल्हाधिकारी कार्यालयातही निवडणूक विभाग सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे; परंतु कामासोबतच शासकीय नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते, याचा विसर कर्मचाऱ्यांना पडलेला दिसून येतो. ड्रेसकोडची अंमलबजावणी येथेही होत नसल्याचे चित्र आहे.
कर्मचाऱ्यांना ओळखणे कठीण
जिल्हा परिषद कर्मचारी टी शर्टवर येत नसले, तरी काही कर्मचारी जीन्सवर आढळून आले. अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत बाहेर होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोरही महिला कर्मचारी बसलेल्या होत्या. कर्मचारी कोणते आणि बाहेरचे लोक कोणते, हे ओळखणे कठीण झाले आहे.
खादीची ॲलर्जी
खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करणे आवश्यक आहे; परंतु कर्मचाऱ्यांना खादीची ॲलर्जी दिसून येते.
तहसील कार्यालयातील चित्र
बुलडाणा येथील तहसील कार्यालयातही ड्रेसकोडचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणचे कर्मचारी रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले होते.
जिल्हा परिषदमधील सर्व कर्मचाऱ्यांना गणवेशसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. कर्मचारी जीन्स, टी शर्टवर दिसून येत नाहीत. ते आढळल्यास चाैकशी करण्यात येईल.
-इंदिरा असवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.