लाॅटरी लागल्याचा मॅसेज, ई-मेल आल्यास सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:08+5:302021-08-18T04:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : सायबर गुन्हेगार लाेकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करीत आहेत. तुम्हाला लाॅटरी लागली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सायबर गुन्हेगार लाेकांची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करीत आहेत. तुम्हाला लाॅटरी लागली आहे, तुम्ही काेट्यवधी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे, अशी बतावणी करून फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे, असे मॅसेज आणि ई-मेल आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये.
गत काही वर्षांपासून ओटीपीची माहिती मागवून फसवणूक करण्यात येत आहे. यामध्ये सुशिक्षित लाेकांची सर्वाधिक फसवणूक हाेत असल्याचे बुलडाणा सायबर सेलकडे आतापर्यंत झालेल्या तक्रारीवरून समाेर आले आहे.
ई-मेल पाठवून हाेते फसवणूक
एखाद्या कंपनीच्या नावाने हे ई-मेल्स किंवा मेसेज पाठविले जातात. या माध्यमातून आपला पासवर्ड, पिन चोरी करून फसवणूक केली जाते. सायबर गुन्हेगार एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या ई-मेल आयडीसारखा वाटणारा डुप्लिकेट ई-मेल तयार करतो. त्या माध्यमातून फसवणूक करण्यात येते.
ही घ्या काळजी
ओपन पब्लिक वायफायचा वापर करू नये. असे केल्यास आपल्या फाेनवरील माहिती लिक हाेण्याची शक्यता आहे. अनाेळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवावी. फेसबुकचा पासवर्ड साेपा ठेवू नये. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये.
पासवर्डबदलत राहावे. आपल्या बॅंक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती अनाेळखी व्यक्तींबराेबर शेअर करू नये. बॅंकेतून कधीही ओटीपीसाठी फाेन येत नाही. त्यामुळे देऊ नये.
वेबसाइटची शहानिशा करण्याची गरज
कोणत्याही वेबसाइटवर क्लिक करण्यापूर्वी त्या नावाची सुरुवात ‘एचटीटीपीएस’ने झाली आहे का?असेल तरच क्लीक करावे. इतर वेबसाइटवर जाणे टाळावे. तसेच गुगलवर विविध कंपन्यांचे कस्टमर केअर क्रमांक सर्च करू नये. असे क्रमांक सर्च केल्याने जिल्ह्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे समाेर आले आहे.
अशी करतात सायबर गुन्हेगार फसवणूक
ओएलएक्सवर कार विकायची आहे. मी सैन्य दलात असल्याने चांगली कार स्वस्तात विकायचे असल्याची बतावणी करण्यात येते. त्याला अनेक जण प्रतिसाद देतात. काही रक्कमही आगाऊ रक्कम म्हणून दिल्या जाते. प्रत्यक्षात कुठलीही कार मिळत नाही.
फेसबुकवर सध्या विविध ग्रुप तयार करण्यात येत आहे. यामध्ये या ग्रुपवर विविध साहित्य विक्रीच्या जाहिराती टाकण्यात येतात. चांगल्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने अनेक जण त्याला प्रतिसाद देतात. पैसे दिल्यानंतर अशी कुठलीही वस्तू मिळत नाही.