घाटाखाली कमळ फुलले
By admin | Published: February 24, 2017 02:15 AM2017-02-24T02:15:12+5:302017-02-24T02:15:12+5:30
शेगाव तालुक्यातील तीनपैकी दोन जागांवर भाजपचा कब्जा.
खामगाव, दि. २३- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आखाड्यात खामगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाला चांगली धोबी पछाड दिली आहे. जिल्हा परिषद गणांमधील ९ पैकी ९ जागांवर, तर पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १२ गणांवर भाजपने ताबा मिळविला आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील ७ पैकी ७ जिल्हा परिषद गणांचा समावेश असून, पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत मिळवित 'परिवर्तन' घडविले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील सुटाळा जिल्हा परिषद गणामध्ये भाजपच्या मालुताई ज्ञानदेवराव मानकर यांनी काँग्रेसच्या सीमा संजय ठाकरे, घाटपुरी जिल्हा परिषद गणामध्ये भाजपच्या जयश्री विनोद टिकार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी जयश्री टिकार यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे अंत्रज-हिवरखेड गणामध्ये भाजपचे डॉ. गोपाळ रामदास गव्हाळे, अटाळी- आशाबाई ज्ञानदेव चिमणकर, कुंबेफळ सर्कलमध्ये भाजपच्याच सौ. महाले तर पिंपळगाव राजा - पुंडलिक भिकाजी बोंबटकार, लाखनवाडा- वर्षा अंबादास उंबरकर विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती सर्कलमध्ये भाजपचे विलास काळे, ऊर्मिला शरदचंद्र गायकी, दुर्गा महाले, राजेश तेलंग, तुषार गावंडे, भगवानसिंह सोळंके, रेखा युवराज मोरे, शीतल समाधान मुंढे, हरसिंग महादू साबळे, रामेश्वर बंड विजयी झाले, तर पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेसच्या मायावती इंगोले, मनीष ठाकरे, ज्योती सातव, पल्लवी पाटील विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद गणांसोबतच चार पंचायत समिती गणांपैकी दोन पंचायत समिती गणांवर ताबा मिळविला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वर्षा वनारे यांना माटरगाव जिल्हा परिषद गटातून पराभव पत्करावा लागला. भाजपच्या स्वाती देवचे यांनी त्यांचा पराभव केला. जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची होम पीच म्हणून या मतदारसंघाची ओळख असली, तरी खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वातच या मतदारसंघातील निवडणूक लढविण्यात आली.