चिखलीत पुन्हा फुलणार 'कमळ'!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:42+5:302021-06-04T04:26:42+5:30
मूळचे खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी 'तलाव जिथे : कमळे तिथे', हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 'लॉकडाऊन' ...
मूळचे खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी 'तलाव जिथे : कमळे तिथे', हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 'लॉकडाऊन' काळात घरी बसून न राहता, हा वेळ पर्यावरणासाठी खर्ची घालावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. ते जिल्हाभरातील तलाव व जलाशय असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या मदतीने तलावांमध्ये कमळ बिया, ट्यूबर व रोपे लावत आहेत. त्यांच्या या उपक्रमात आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, मित्रमंडळी तथा पर्यावरणप्रेमी सहभागी होत असून परिसरातील डबकी, तलाव व छोट्या नदीवरील बांध याचा शोध घेऊन वरील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमळ फुलविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परिणामी, राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात कमळ फुलेल की नाही, याची शाश्वती नसली तरी गुरव यांच्या प्रयत्नाने खरेखुरे कमळ फुलल्यानंतर हा जिल्हा कमळमय होणार, हे मात्र निश्चित.
चिखली तालुक्यातील तलावात राबविला उपक्रम
गुरव यांचा संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलविण्याचा मानस आहे. याअंतर्गत चिखली तालुक्यातील गोद्री, माळशेंबा, खोर या ठिकाणच्या तलावात त्यांनी कमळाच्या बिया लावल्या. त्यामध्ये विविध रंगाच्या कमळाचा समावेश असून परिसराचे सौंदर्य वाढविणे, उपलब्ध जलसाठ्याची धूप न होऊ देणे, रोजगार निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे. यावेळी किशोर भागवत, अमित कुहिरे, रविंद्र खानंदे उपस्थित होते.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार!
कमळाची रोपे मोठ्या प्रमाणावर रुजल्यावर संपूर्ण पाण्याचा भाग कमळपानांनी आच्छादित होईल व ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची धूप कमी प्रमाणात होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तथापि, कमळपुष्प मोठ्या प्रमाणावर उमलल्यानंतर परिसरातील नागरिकांना यातून निश्चितच रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.