निवडणुकीच्या कामात हलगर्जी; ७१ शिक्षकांविरोधात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:44 PM2020-02-05T14:44:13+5:302020-02-05T16:24:50+5:30
७१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरोधात (शिक्षक) मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर: छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षीप्त पुनर्निरीक्षण व मतदार पडताळणी कार्यक्रमास सहकार्य न करता कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मेहकर तालुक्याील ७१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरोधात (शिक्षक) मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याच्या दृष्टीने ज्या शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अदिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी घरोघरी जावून हायब्रीड बीएलओ अॅपनुसार मतदार पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते देऊन तीन महिने उलटले तरी या कामास अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना सुचना देऊनही यात सुधारणा झाली नव्हती. यासाठी संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र तरी यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या निर्देशानुसार नायब तहसिलदार पंकज मगर यांनी निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा करणाºया ७१ शिक्षकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून या शिक्षकांविरोधात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामासाठी तालुक्यातील २४१ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यातील ७१ शिक्षकांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. १३ फेब्रुवारी रोजी हे काम पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. मात्र दोन फेब्रुवारीला मतदार पडताळणीच्या कामाचे अवलोकन केले असता या ७१ शिक्षकांचे काम शून्य दिसून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ नुसार व भारतीय दंड संहिता १९६० च्या कलम १८८ नुसार पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील दोन लाख १७ हजार ८८ मतदारांच्या याद्यांचे पुनर्निरीक्षण नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान हे काम करावयाचे होते. मेहकर तालुक्याचे यासंदर्भातील काम आतापर्यंत अवघे सात टक्केच झाले आहे.
शिक्षकांनी न्यायालयात घेतली होती धाव
निवडणूक आयोगाच्या कामामुळे अध्यापणाकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच या कामाकडे दुर्लक्ष केले होते, असे म्हणत शिक्षकांनी यापूर्वी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास दाद न मिळाल्याने २०८ मतदा केंद्रस्तरीय अधिकारी (शिक्षक) यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांना या प्रकरणात स्थगिती आदेश मिळू शकला नव्हता. दरम्यान, त्यानंतर या प्रकरणात ७१ जण कारवाईस पात्र ठरले आहेत.
निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम व पडताळणी कार्यक्मर हाती घेतला होता. त्यासाठी मेहकर तालुक्यात २४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (शिक्षक) यांची नियुक्ती करून प्रशिक्षणही दिले होते. मात्र संबंधीत शिक्षकांनी ही बाब सुचना व कारणे दाखवा नोटीस देवूनही गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे निष्क्रीय शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
(गणेश राठोड ,उपविभागीय अधिकारी ,तथा निवडणूक निर्णायक अधिकारी, मेहकर)
मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयावर निवडणूक विभागाने कोणती कारवाई केली, याबाबत कल्पना नाही. त्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर बोलता येईल.
( ज्ञानेश्वर धांडे, पालिका प्राथमिक शिक्षक संघटना, शाखा मेहकर)