गरजू विद्यार्थिनींच्या मदतीसाठी लुधियाना येथील शिक्षिकेचा पुढाकार!
By admin | Published: September 12, 2016 01:46 AM2016-09-12T01:46:29+5:302016-09-12T01:46:29+5:30
हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरमहा देणार मदत; सोशल मीडिया ठरला महत्त्वाचा दुवा.
चिखली (जि. बुलडाणा), दि. ११ : विविध अभिनव उपक्रमाद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती सोशल मीडिया फेसबुकवरून प्राप्त झाल्याने हिरकणी प्रतिष्ठानमार्फत महिला व विद्यार्थ्यांंसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमाने प्रभावित झालेल्या लुधियाना पंजाब येथील मनप्रीत कौर यांनी यात सहभाग नोंदविण्यासह प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थिनींना मदत देण्याच्या भावनेने येथून पुढे दर महिन्याला १५00 रुपये मदत देण्याचे जाहीर केले असून त्याबाबत प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली बोंद्रे यांच्याशी संपर्कदेखील साधला आहे. हिरकणी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याने घेतलेल्या उत्तुंग भरारीची ही परप्रांतातून मिळालेली पावती प्रतिष्ठानचा उत्साह द्विगुणित करणारी ठरली आहे.
हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या होणार्या कार्यक्रमाची, कार्याची, सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट केल्या जाते. यानुषंगाने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजला भेट देऊन माहिती जाणून घेतल्यानंतर केवळ लाईक करून न थांबता लुधियानाच्या मनप्रीत कौर प्रतिष्ठानच्या कार्याने प्रेरित होऊन या कार्यात आपल्या परीने मदत व्हावी म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला व समाज कार्यासाठी हिरकणी प्रतिष्ठानला मदत करण्याचे हेतूने दर महिन्याला १५00 रुपये गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे सांगितले. तसेच हिरकणी प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मदत मनप्रीत कौर यांनी जमादेखील केली आहे. मनप्रीत कौर - लुधियाना येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून, गोरगरीब विद्यार्थिनींना शिक्षणासाठी येत असलेली अडचणींची त्यांना जाणीव असल्याने स्वत:ची परिस्थिती जेमतेम असतानाही सामाजिक कार्यात योगदान देण्यासह शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने चांगल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेचा शोध घेत असताना सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणची माहिती त्यांना मिळाली. मदत छोटी परंतु मनाचे मोठेपण अथांग, म्हणून ही मदतही हिरकणी प्रतिष्ठानसाठी मोलाची ठरली आहे.